नव्या चन्नी सरकारचा रिमोट सिद्धूंच्याच हातात असणार

सिद्धूंनी चन्नी यांच्या नावाला पाठिंबा देण्यामागे एक विशेष कारण आहे.
sarkarnama
sarkarnamasarkarnama

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची (Punjab Chief Minister) चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channy) आज शपथ घेणार आहे. पदाची शपथ घेण्यापूर्वी आज चरणजीत सिंह चन्नी यांनी सकाळीच आपल्या विधानसभा मतदारसंघातील रुपनागरच्या कतलगढ साहिब गुरुद्वारात जाऊन आशीर्वाद घेतले. तर सुखजींदर रंधावा आणि ब्रह्म मोहिंद्रा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात येणार आहे. पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्या शपथविधी सोहळ्यात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह सहभागी होणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावावर सहमती झाली होती, परंतु कॉग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) त्यांच्या नावावर सहमत नव्हते. सिद्धू यांनी स्वत:ला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा केला होता, पण ते पंजाब काँग्रेसचे प्रमुख आहेत, त्यामुळे हायकमांडने त्यांच्या नावाला मान्यता दिली नाही.

sarkarnama
नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे आमदार सीआयडीच्या रडारवर

सिद्धू कॅम्पमध्ये दलित मुख्यमंत्री बनवण्याबाबत चर्चा झाली. सिद्धूंनी चन्नी यांच्या नावाला पाठिंबा देण्यामागे एक विशेष कारण आहे. वास्तविक, सिद्धू यांना एक असा मुख्यमंत्री हवा आहे, जो त्यांचे म्हणणे ऐकेल, पण सुखजींदर रंधावांचा स्वभाव तसा नाही. यामुळेच आता या नव्या चन्नी सरकारचा रिमोट हा सिद्धूंच्याच हातात असणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पंजाबमध्ये 32% दलित मतदार आहेत. यामध्ये शीख आणि हिंदू समाजातील दलितांचा समावेश आहे. पंजाबमध्ये जाट शीख समाज केवळ 19% आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी पंजाबवर राज्य केले आहे. यामुळेच राजकीय पक्षांनी हा मुद्दा बनवायला सुरुवात केली. दलितांना उच्च पदावर बसण्यास सांगून जातीय ध्रुवीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळेच काँग्रेसने दलित व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी बसवून मोठा संदेश दिला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणारे चरणजीत सिंह चन्नी हे अनुसूचित जातीतील पहिलेच मुख्यमंत्री ठरत आहेत. दलित मुख्यमंत्र्याची निवड करुन काँग्रेसने अनेक समस्यांवर तोडगा काढल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. पण प्रत्यक्षात नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी हे किती प्रभावी सिद्ध होतात, यावरच पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

चरणजीत सिंह चन्नी सलग तीन वेळा चमकौर साहिबमधून आमदार झाले आहेत. 2007 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. यानंतर ते दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. ते 2015 ते 2016 पर्यंत पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2017 मध्ये त्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री करण्यात आले. अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ऑगस्टमधील बंडाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये चन्नी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com