तीन सदस्यीय प्रभाग : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरण बदलली..

निवडणूक आयोगाचे (Election Commission) उपायुक्त अविनाश सणस यांनी निवडणूक होऊ घातलेल्या सर्व महापालिका आयुक्तांच्या नावे काल (ता.५ ऑक्टोबर) आदेश जारी केला आहे.
तीन सदस्यीय प्रभाग : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरण बदलली..
PCMC Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, (PCMC) पुण्यासह राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुका (Municipal Election) या तीन सदस्यीय पद्धतीने घेण्याचा अध्यादेश ३० सप्टेंबर रोजी राज्यपालांनी काढला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने कच्ची प्रभाग रचना तातडीने तयार करण्याचा आदेश मंगळवारी (ता.५ ऑक्टोबर) जारी केला आहे. दरम्यान, चार ऐवजी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता प्रभाग संख्येत बदल झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत 32 प्रभाग होते, ते आता वाढून ४३ प्रभाग आगामी निवडणुकीत असणार आहेत. एक प्रभाग हा दोन सदस्यांचा राहणार आहे.

PCMC
वाकडमध्ये पुन्हा झळकले फ्लेक्स : होय, मी रस्ता बोलतोय !

गतवेळी प्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसारच ह्या निवडणूकीत सुद्धा प्रभागरचना होणार आहे. त्यामुळे पालिकेतील सदस्यसंख्या वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिणामी २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे १२८ नगरसेवकच पालिकेत पुन्हा २०२२ ला असणार आहेत.

निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी निवडणूक होऊ घातलेल्या सर्व महापालिका आयुक्तांच्या नावे काल (ता.५ ऑक्टोबर) आदेश जारी केला. त्यानुसार तातडीने कालपासूनच कच्ची प्रभाग रचना तयार करून पाठवण्यास सांगण्यात आले, असून हे करत असतांना वाद टाळून गोपनीयता राखण्याचे बजावले आहे. तसेच, त्यावर हरकतींची संख्या कमी राहील, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. जेणेकरून नंतर न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांची संख्याही कमी राहील, असे या आदेशात म्हटले आहे.

PCMC
पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला घरचा आहेर

प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता कायम राहील, हे पाहण्यास सांगण्यात आले आहे. सर्वाधिक हरकती मोडतोड करून करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेवरच राजकीय पक्ष व त्यांच्या इच्छूकांची असते. याचे कारण सत्ताधारी हे आपल्या विजयासाठी अशी प्रभाग रचना करीत असल्याचा विरोधकांचा आक्षेप असतो. विजयाचे गणित हे या प्रभाग रचनेवरच अवलंबून असते, असे इच्छूकांचेच नाही, तर नगरसेवकांचेही म्हणणे असते. कारण त्यांच्या हक्काचे मतदार असलेली मोठी संख्या जर तुटली तर, विजयाचे गणित फिस्कटून जाते. त्यामुळे ही प्रभाग रचना कशी होते, याची धाकधूक इच्छूकांसह विद्यमान नगरसेवकांनाही असते. दरम्यान, गतवेळी चारचा प्रभाग होता. तो यावेळी दोनचा झाला असता तर, प्रभागरचना करणे अधिक सोईचे गेले असते. मात्र, तीनच्या प्रभागामुळे जुन्या रचनेत मोठा बदल, फेरफार होणार आहे.

२२ पैकी १८ महापालिकांच्या निवडणूका या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहेत. तर, औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूर या चार महापालिकांच्या निवडणूका त्या अगोदर म्हणजे डिसेंबरमध्ये एकसदस्यीय पद्धतीने होणार होत्या. मात्र, आता त्या सुद्धा तीन सदस्यीय पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट करीत, त्यांची प्रभागरचना ही तीनचीच करा असे आयोगाने सांगितले आहे. दरम्यान, राज्य मंत्रीमंडळाचा तीन सदस्य पद्धतीचा निर्णय व राज्यपालांनी तसा अध्यादेश काढताच पिंपरी पालिका प्रशासनाने तशी प्रभाग रचना तयार करण्याची तयारीही सुरु केली. त्यासाठी त्यांनी २५ सदस्यांची समितीच स्थापन केली आहे.

Related Stories

No stories found.