अजित पवारांचा तो `प्लॅन` रोखण्यासाठी चंद्रकांतदादा आता मैदानात! - chandrkant patil interact with punes corporeter | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांचा तो `प्लॅन` रोखण्यासाठी चंद्रकांतदादा आता मैदानात!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

पुण्यातील सत्ता टिकविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली असून इतर पक्षात जाऊ पाहणाऱ्या नगरसेवकांसोबत संवाद साधण्याची त्यांची योजना आहे.

 

पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुणे महापालिकेतील काही नगरसेवक पालकमंत्री अजित पवार यांना भेटत असल्याच्या पाश्‍‍र्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उमनगरातील सर्व नगरसेवकांची भेट घेणार आहे. पुण्यातील सत्ता टिकविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली असून इतर पक्षात जाऊ पाहणाऱ्या नगरसेवकांसोबत संवाद साधण्याची त्यांची योजना आहे.

गेल्या काही दिवसात भाजपाच्या काही नगरसेवकांनी पालकमंत्री अजित पवार यांची पुण्यात तसेच मुंबईत भेट घेतली. महापालिकेच्या निवडणुकीला बरोबर एक वर्ष उरले असून निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे ३०-४० नगरसेवक राष्ट्रवादीत आणण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. या ३०-४० नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक गेल्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून भाजपा आलेले आहेत. वातावरणाचा अंदाज घेत यातील काहीजण आता स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. त्यातील काहीजणांनी पालकमंत्री पवार यांची भेट घेतली आहे. स्वगृही परतणाऱ्या नगरसेवकांमध्ये वडगाव शेरी मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ भाजपातील नगरसेवक एकसंध आहेत. कुणी कुठेही जाणार नाही. मी स्वत: उपनगरातील सर्व नगरसेवकांशी संवाद साधणार आहे. शहराच्या सर्व भागातील विकासकामांवर माझे लक्ष आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर राहील.’’

पुणे आणि पिंपरी महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न होतील. तर या दोन्ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवार टोकाचे प्रयत्न करणार असल्याने येत्या वर्षभरात पुणे-पिंपरीतील राजकीय वातावाण ढवळून निघणार आहे. भाजपाचे उपनगरातील नगरसेवक पालकमंत्री अजित पवार यांना भेटत असल्याने भाजपातील अस्वस्थता वाढली आहे. पक्षातील नगरसेवक इतरत्र जाऊ नयेत ही यामागची भावना असून यातूनच चंद्रकांत पाटील उपनगरातील नगरसेवकांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधणार आहे.

पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीबरोबरच चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून आमदार आहेत. पुण्याबरोबरच पश्‍चिम महाराट्राची जबाबदारी पाटील यांच्याकडे आहे. मुंबईनंतर मोठी महापालिका असलेल्या पुण्यात भाजपाची सत्ता आहे. ही सत्ता टिकविण्यासाठी पक्षाकडून तसेच पाटील यांच्याकडून  प्रयत्न होणार यात शंका नाही. मात्र, राज्यात आघाडीची सत्ता असल्याने पालकमंत्री पवार यांच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे. 

Edited By : Umesh Ghongade 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख