
पुणे : राज्यसभा निवडणुकीत गुलाल उधळला असला तरी मी कंजूष मारवाडी असल्याने विधान परिषदेसाठी देखील राखून ठेवला आहे. आमचा पाचही जागांवर विजय नक्की असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला. ते भाजपच्या लोकसभा प्रवास बैठकीनंतर मुंबईत बोलत होते.
मोठ्या चुरशीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत करीत विजय संपादन केला. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या नियोजनामुळे भारतीय जनता पार्टीचे तीन खासदार राज्यसभेवर निवडून गेले.
यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले ‘‘ आमचे नियोजन पक्के आहे. जशी राज्यसभा निवडणूक जिंकली त्याचप्रमाणे विधानपरिषद सुद्धा आम्ही जिंकू. विधान परिषदेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील. पाचवा उमेदवारदेखील चांगल्या मतांच्या फरकाने निवडून येतील.’’
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारची विशेषत: शिवसेनेचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी सतर्क झाले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक-निंबाळकर व कॉंग्रेसचे भाई जगताप हे दोन्ही उमेदवार अपक्षांसह बहुजन विकास आघाडीची तीन मते मिळावीत यासाठी प्रयत्नशील आहेत.
विधान परिषदेचे सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या साऱ्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘ काहीही असलं तरी आमचे नियोजन पक्के आहे. नियोजनाप्रमाणे सर्वकाही पार पडेल आणि विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचे सर्व पाच उमेदवार निवडून येतील.’’
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.