कोथरूडसाठी चंद्रकांतदादा झाले अॅक्टिव्ह .. दर पंधरा दिवसांनी बैठकीचा वादा - Chandrakantdada becomes active for Kothrud and Promise of meeting every fortnight | Politics Marathi News - Sarkarnama

कोथरूडसाठी चंद्रकांतदादा झाले अॅक्टिव्ह .. दर पंधरा दिवसांनी बैठकीचा वादा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

सर्व नगरसेवकांसह घेतली पालिकेत बैठक

पुणे : भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभरात लक्ष देत असतानाच मी कोथरूडचा आमदार म्हणून देखील कार्यरत असून येथील सर्व समस्या सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करत असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दर पंधरा दिवसांनी आणि पुणे महापालिकेत दर एका महिन्याने बैठक घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

कोथरूडमधील विविध समस्यांवर समाधान शोधण्यासाठी प्रशासन व  लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठकीत आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कचरा प्रकल्पांशी संबंधित विषयावर काम सुरु असून अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहेत. तसेच राज्य शासनाने कचरा प्रकल्पासाठी नवीन जागा मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात व त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ही स्पष्ट केले. दर १५ दिवसांनी क्षेत्रीय कार्यालयात व महिन्यातून एकदा मनपा मुख्य कार्यालयात बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी खर्डेकर यांच्याकडे देण्यात आली. 

या बैठकीत ठरलेले प्रमुख मुद्दे

१)सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्पाबाबत एनजीटीने दिलेले आदेश व लोकभावना लक्षात घेऊन कार्यवाही करण्याची प्रशासनाला सूचना केली.

२) कोथरूड मधील विविध रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यात प्रलंबित असलेल्या शिवणे खराडी हा १८ किमी  रस्ता, नदीपात्रातील रस्ता,बालभारती पौड फाटा रस्ता यासंदर्भात संदीप खर्डेकर यांनी जागा ताबासह अनेक प्रश्न उपस्थित केले. नगरसेवक दीपक पोटे यांनी ही नदीपात्रातील रस्ता डीपी रस्त्याला जोडण्याबाबत सूचना केली. तर नगरसेवक जयंत भावे यांनी रस्त्यासाठीच्या जागा ताब्यात घेताना जागामालकांना आरक्षण कर्जरोख्यांचा (RCB  रिझर्वेशन क्रेडिट बॉंड) पर्याय देण्यात यावा, अशी सूचना मांडली.

३) कोथरूड येथे वारंवार वीज जाण्याच्या घटना घडतात. अश्या स्थितीत मनपा प्रशासनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी सूचना पाटील यांनी केली. बाळासाहेब टेमकर यांनी वीज वितरण कंपनीला काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला.

4)  बाणेर येथे गावठाण भागात ३५०/४०० घरांवर `बीडीपी`चे आरक्षण पडले असून ते चुकुन पडले असल्याचे प्रशासनाने मान्य केल्याचे गणेश कळमकर यांनी सांगितले. आरक्षण उठविण्याचा विषय समित्यांमधे मान्य झाला असून हा विषय त्वरित मुख्य सभेपुढे सादर करुन त्यास मान्यता घ्यावी व नागरिकांवरील अन्याय दूर करावा असेही त्यांनी सुचवले. तसेच पाषाण बाणेर लिंकरोडचे काम ही पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

5) नगरसेवक दिलीप वेडे पाटील व श्री.गणेश वर्पे यांनी आशीष गार्डन येथे डी पी रस्त्यावरील अतिक्रमणाचा विषय मांडला व येथे रुंदीकरण केले जावे व एकलव्य कॉलेज पुढील रस्ता महमार्गाला जोडावा अशी मागणी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख