परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी चंद्रकांतदादांनी उपचार सुरू करावेत

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे
chandrakant patil
chandrakant patilsarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोल्हापूरच्या जनतेला घाबरून पुण्यात पळून आलेले आपल्या पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील विद्यमान महिला आमदारांचा मतदारसंघ बळकावून कसेबसे आमदार झालेले माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी चंद्रकांत पाटलांनी उपचार सुरू करावेत.त्यासाठी लागणारा खर्च करण्यास आम्ही तयार आहोत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल हास्यास्पद वक्तव्य करीत आहेत. त्यांनी अजित पवार यांनी दिलेल्या झटक्यातून सावरावे आणि पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत अजितदादांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो पचविण्याची तयारी ठेवावी, अशी टीका शहराध्यक्ष जगताप यांनी केली आहे.

राज्यातील सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संतुलन अधिकच बिघडले आहे. त्यामुळे, भाजपाच्या इतर नेत्यांना टप्प्याटप्प्याने उपचाराची गरज असली, तरी चंद्रकांत पाटील यांना मात्र तत्काळ उपचाराची गरज आहे. सत्तेविना तडफडत असल्याने ते रोज रात्री सत्तेची स्वप्ने बघतात, असे जगताप यांनी म्हटले आहे.

सकाळी झोपेतून उठतात तेव्हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आपण धक्का लावू शकत नाही, याची त्यांना जाणीव होते. त्यातच त्यांना विस्मरणही होत असेल. चंद्रकांत पाटील हे ज्या माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवीकरण करू पाहात आहेत, त्यांना एकदा अजित पवार यांनी दिलेला झटका कसा होता हे विचारावे. कदाचित फडणवीस हे जेव्हा आपल्या शंभरहून अधिक आमदारांसोबत असतात, तेव्हा ‘एकट्या अजित पवार यांनी आपल्या शंभरहून अधिक आमदारांना घरी बसवले आहे. हे शंभर आमदार खिशात घेऊन फिरू का?,’ असेच म्हणत असतील. परंतु, चंद्रकांत पाटलांना ते नीट ऐकू येत नसेल, अशी टीका जगताप यांनी केली आहे.

chandrakant patil
लोकशाही विरोधात भारतीय जनता पक्षाचा कट : सचिन सावंत

प्रदेशाध्यक्षपद जाण्याची भीती, पद टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड, सत्तेची स्वप्ने, नियमित स्वप्नभंग, त्यातून वायफळ बडबड करणे, या व्याधीही त्यांना जडल्या आहेत. त्यातच स्वत: प्रतिनिधित्व करीत असलेला विधान परिषदेचा मतदारसंघही राखता आला नाही. नुकतेच त्यांनी ‘मला माजी मंत्री म्हणू नका, तीन दिवसांत कळेल,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला तीन दिवस उलटून गेल्यानंतर आता याबाबत कुणी विचारले, तर काय उत्तर द्यायचे असा प्रश्न पडल्याने ते आदरणीय अजित पवारांबद्दल वक्तव्य करीत सुटले आहेत. त्यामुळे, परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी त्यांनी त्वरित उपचार सुरू करावेत. या संपूर्ण उपचाराचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करण्यास तयार आहे, असे जगताप यांनी सांगितले.

जगताप म्हणाले, ‘‘ ज्यांची स्वत:च्या जिल्ह्यातून निवडून यायची पात्रता नाही, त्यांनी अजित यांच्यावर बोलावे? विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात सपाटून मार खाणार हे स्पष्ट दिसत असल्याने चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यासाठी त्यांच्या पक्षातीलच एका विद्यमान आमदार भगिनीचा मतदारसंघ बळकावला. आता कोथरूडमधून आमदार झाल्यावरही त्यांची ‘खिशात’ घालायची सवय काही गेलेली दिसत नाही. म्हणूनच, कोथरूडमधील ७४ ॲमेनिटी स्पेस खिशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुणेकरांच्या मालकीच्या या ॲमेनिटी स्पेस आधी खिशातून काढा, अशी आपणास एक पुणेकर म्हणून नम्र विनंती करतो.’’

जगताप म्हणाले, ‘‘ चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांच्यावर बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. एका दिवसात आजी मुख्यमंत्र्याला माजी मुख्यमंत्री करण्याचा जो झटका अजित पवार यांनी दिला आहे, त्यातून अद्याप भाजपनेते सावरलेले दिसत नाहीत. यातून ते लवकर सावरावे, पुणे महानगरपालिकेतही होऊ घातलेला पराभव पचविण्याची ताकद मिळावी, चंद्रकांत पाटील हे मानसिक आजारातून बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अन्यथा, ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला किंवा पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अशी वायफळ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवरील उपचारासाठी एक ‘जम्बो ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करावे लागेल काय, अशी भीती वाटत आहे. ’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com