भाजपच्या पराभवाची जबाबदारी चंद्रकांत पाटलांनी घ्यावी : या नेत्याने केली मागणी - chandrakant patil must take responsibility of defeat demands ex MP Kakade | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या पराभवाची जबाबदारी चंद्रकांत पाटलांनी घ्यावी : या नेत्याने केली मागणी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

भाजपमध्ये पराभवावरून आता वादाची ठिणगी

पुणे : विधान परिषद निवडणुकीत राज्यात भाजपचा धुव्वा उडाल्याने आता पक्षातील नाराजी पुढे येऊ लागली आहे. माजी खासदार संजय काकडे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पक्षाने या निवडणुकीत झालेल्या चुका तातडीने दुरूस्त कराव्यात अन्यथा आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

काकडे हे पक्षाचे सहयोगी खासदार होते. त्यांनीच आता पाटील यांच्याविरुद्ध तोफ डागली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात योग्य नियोजन नव्हते. नगरसेवक, इतर पदाधिकारी यांना त्यात सहभागी करून घेण्यात आले नाही. निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी केली, यातच नेतृत्त्व खूष होते. पण हे मतदान आपल्याला कसे करून घेता येईल, हे पाहिले गेले नाही. तसेच स्थानिक मुद्यांऐवजी भलत्याच मुद्यांना महत्त्व दिल्याने मतदारांवर त्याचा योग्य परिणाम झाला नाही. पदवधीर निवडणुकीसाठी जे मेळावे झाले त्या मेळाव्याला पदवीधर तरी येतील, याची खातरजमाही करून घेतली नाही. त्यामुळे मतदारांपर्यंत प्रचार योग्य रितीने पोहोचलाच नाही. पक्षाने आता तातडीने धोरणात बदल करण्याची गरज आहे. लोकांना भावतील असे मुद्दे मांडले पाहिजेत. हवेत राहून प्रचार करणे योग्य नाही. तीनही पक्षांच्या विरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार करावे लागेल. सर्वांंना सोबत घेऊन काम करावे लागेल. पुणे, नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले मानले जात होते. तेथेह पक्षाल यश न मिळणे क्लेशकारक आहे. याचे आत्मपरीक्षण करण्याची तातडीने गरज आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी तुमची मागणी आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की याचा निर्णय पाटील यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने घ्यावा. मात्र गेले काही दिवस पक्षाची पिछेहाट होत आहे, त्याची कारणे शोधली पाहिजे, एवढी माझी मागणी आहे. 

राज्यात सहा ठिकाणी झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त एक जागा मिळाली. पक्षाचे अमरिश पटेल हे धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आले. अमरावती शिक्षक मतदारसंघात  अपक्ष उमेदवार किरण सरनाईक पुढे आहेत. इतर चार ठिकाणी भाजपचा पराभव झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख