कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रा. कवाडे-खरातांना आमदारकी मिळणार का ? - can kawade and kharat will mlc from congress ? | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रा. कवाडे-खरातांना आमदारकी मिळणार का ?

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

आपल्या नेत्याला आघाडीकडून सन्मान दिला जात नसल्याची भावना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे.
 

 

पुणे : राज्यात महाआघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेल्या अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या प्रा. जोगेंद्र कवाडे तसेत सचिन खरात यांना आमदारकी मिळाली नाही.आपल्या नेत्याला आघाडीकडून सन्मान दिला जात नसल्याची भावना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे.

खरात यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) या पक्षाची राष्ट्रवादीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून आघाडी आहे तर प्रा. कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टीची कॉंग्रेसबरोबर आघाडी आहे. गेल्यावर्षी महाआघाडी सरकार सत्तेत आले. त्याआधी राज्यात भाजपाचे सरकार होते. त्या काळातही हे दोन्ही पक्ष कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर होते. सत्ता आल्यानंतर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सत्तेत सहभागी करून घ्यावे. प्रा. कवाडे व खरात यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळावी, अशी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. खरात हे रिपब्लिकन पक्षाचे तर प्रा. कवाडे पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत. कवाडे यांचा विदर्भात तर खरात यांचा मुंबई तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात प्रभाव आहे.

राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहूजन आघाडी स्थापन करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच भारतीय जनता पार्टीला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्याच्या काही भागात त्यांचा प्रभाव जाणवला. मात्र, दलित चळवळीतील आठवले यांची रिपब्लिकन पार्टी भाजापसोबत सत्तेत आहे. तर प्रा. कवाडे व खरात अनुक्रमे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राजकारण करीत आहेत. शिवसेना वगळता महत्वाच्या सर्वच पक्षांबरोबर राज्यातील दलित नेतृत्व विभागलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला सत्तेची आकांक्षा आहे. त्यातूनच प्रा. कवाडे व खरात यांना आमदारकी हवी आहे. खरात यांचा अजित पवार यांच्याशी चांगला संपर्क आहे. प्रा. कवाडे यांचा राज्यातील विशेषत: विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांशी चांगला संपर्क आहे.

निवडणुकीच्या राजकारणात दलित चळवळीतील नेत्यांना सर्वच पक्षांकडून महत्व दिले जाते. मात्र, निवडणुका झाल्यानंतर सत्तेचा प्रश्‍न येतो तेव्हा या नेत्यांचा विसर पडतो अशी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांची भावना आहे. रामदास आठवले हे २०१४ पासून केंद्रात सलग सत्तेत आहेत. सत्तेशी जुळवून घेण्याचे कसब आठवले यांना चांगलेच जमले आहे. मात्र, दलित चळवळीतील इतर नेत्यांना ते जमेलेले नाही. महाआघाडी सरकार स्थापन होण्यात खारीचा वाटा असलेल्या खरात व प्रा. कवाडे यांना महाआघाडीतील घटक पक्ष आमदारकी देणार का ? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
-----

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख