
उत्तम कुटे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी रविवारी (ता.५) भाजपने शहरातील तेराशे बूथप्रमुखांचे संमेलन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केले होते. त्यासाठी तेथे अगोदरच बूकिंग झालेल्या दोन नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आले होते. मात्र, ज्यांच्या उपस्थितीत हे बूथसंमेलन होणार होते. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याने हे संमेलनही ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्यामुळे नाट्यरसिकांचा हिरमोड झाला, तसा तो भाजप कार्यकर्त्यांचाही.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी दहा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमुळेही हे संमेलन रद्द करण्यात आल्याचे शहर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. आता विधानपरिषदेच्या वीस तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर हे संमेलन महिनाअखेरीस (ता.२५) होईल,असे ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याने घर घर चलो अभियानाची माहितीही या संमेलनात दिली जाणार होती.
त्यात मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना घराघरात पोचवल्या जात आहेत. या संमेलनासाठी पूर्ण दिवसाकरिता नाट्यगृह बुक करण्यात आल्याने तेथे अगोदरच बुकिंग झालेल्या नाटकांना रसिक प्रेक्षक मुकले. या नाटकांची कालची तारीख रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनाने या नाटकांच्या संस्थेवर दबाव आणला होता,अशी चर्चा ऐकायला मिळाली.तर, त्यासाठी विनंती केल्याने आणि लवकरच दुसरी तारीख देण्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितल्याने आमची रविवारची (ता.५)मोरे प्रेक्षागृहाची तारीख रद्द केली,असे `दादा,एक गुड न्यूज आहे`या काल होणाऱ्या एका नाटकाच्या संस्थाचालकाने सरकारनामाला याबाबत सांगितले. प्रसिद्ध नाट्य व सिनेअभिनेता उमेश कामत या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.