पुण्यात भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढले

पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन भाजपला टक्कर दिली. मात्र, यात अखेर भाजपची सरशी झाली आहे.
bjp wins committee elections of pune municipal corporation
bjp wins committee elections of pune municipal corporation

पुणे : महापालिकेतील पूर्ण बहुमताच्या बळावर भारतीय जनता पक्षाने चारही विषय समित्यांची अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडूक जिंकली. या निवडणुकीत भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसने महाविकास आघाडी करीत आपले उमेदवार उभे केले. मात्र, अपेक्षेप्रमाणे भाजपनेच आपले वर्चस्व कायम करीत या महाविकास आघाडीला धूळ चारली.

या समित्यांपैकी महत्वाच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी प्रसन्न जगताप यांची निवड झाली आहे तर महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्याकडे आली आहे. विधी समितीच्या अध्यक्षपदी मनिषा लडकत तर क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी वीरसेन जगताप निवडून आले आहेत.

या समित्यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपला होता. मात्र, लॉकडाउनच्या काळात ही निवडणूक होऊ शकली नव्हती. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविली. निवडणुकीसाठी काही सदस्यांनी ऑनलाइन मतदान केले. सत्ताधारी भाजपचे महापालिकेत स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे विषय समित्यांमध्ये त्यांचे उमेदवार बाजी मारणार, हे निश्‍चित होते. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रित येत आघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

शहर सुधारणा समिती अध्यक्षपदी भाजप नगरसेवक प्रसन्न जगताप यांची निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश ढोरे यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदासाठी भाजपच्याच शितल सावंत यांनी काँग्रेसच्या चाँदबी हाजी नदाफ यांचा पराभव केला. विधी समितीच्या अध्यक्षपदी मनिषा लडकत यांची निवड झाली. त्यांनी शिवसेनेच्या संगीता ठोसर यांचा पराभव केला. मनिषा कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी भागवत यांचा पराभव करत उपाध्यक्षपद मिळविले. 

महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या माधुरी सहस्त्रबुद्धे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हमीदा सुंडके यांच्यात निवडणूक झाली. यात सहस्त्रबुद्धे यांनी सुंडके यांचा पराभव केला. वृषाली चौधरी आणि शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांचा पराभव करत उपाध्यक्षपदाची निवडणुक जिंकली. क्रीडा समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे वीरसेन जगताप आणि कॉंग्रेसचे अविनाश बागवे यांच्या झालेल्या लढतीत जगताप यांनी बागवे यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदासाठी छाया मारणे यांनी राष्ट्रवादीचे वनराज आंदेकर यांचा पराभव केला.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com