
Police take action against MLA poster
Sarkarnama
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) तीन आमदार आहेत. मात्र, विधानसभा सदस्य म्हणजे आमदार अशा स्टीकर लावलेल्या अनेक मोटारींचा 2018 मध्ये सुळसुळाट झाला होता. टोल वाचवण्यासाठी तसेच, प्रतिष्ठेपायी आमदारांचे अनेक कार्यकर्ते हे असे स्टीकर्स लावून तोतये आमदार बनले होते. मात्र, त्याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि हा बनावट आमदारांचा वावर शहरात थांबला. मात्र, आता पुन्हा काहींनी अशोकस्तंभ मुद्रित असलेले स्टीकर्स लावून आमदार आणि खासदार म्हणून मिरवण्यास सुरूवात केली आहे. त्याबाबत खुद्द राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) (Additional director general of police) यांनीच आता कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे अशोकस्तंभाचे स्टीकर्स लावू नयेत वा ज्यांनी लावले आहेत त्यांनी ते काढून टाकावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोमवारी (ता.13 डिसेंबर) केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 2018 ला अनेक बोगस आमदार मिरवत होते. त्यात काही नगरसेवकही होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा भोसरी विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाने आपल्या मोटारीवर आमदार म्हणून स्टीकर लावले होते. त्याबाबत बातम्या प्रसिद्ध होताच नंतर त्यांनी ते काढून टाकले.
2018 ला व त्यापूर्वीही शहरातील आमदारांनीच आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा सदस्य असलेले स्टीकर्स दिल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. त्यातूनच शहरात संख्येपक्षा अधिक आमदारांच्या मोटारी फिरू लागल्या होत्या. अशा मोटारीतील बोगस आमदार हे खऱ्या आमदारांचे कार्यकर्ते असल्याची तक्रार महापालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी पोलिस आयुक्त के. पद्मनाभन यांच्याकडे करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नंतर दिसून आले होते. कारण, अशा तोतयांवर त्यानंतर काहीच कारवाई शहरात झाली नव्हती. उलट पुणे ग्रामीणमध्ये त्यासंदर्भात गुन्हा दाखल होताच पिंपरी-चिंचवडमधील अशा तोतयांना आपसूक आळा बसला होता.
दरम्यान, विधानसभा सदस्य असे स्टीकर लावण्याचे फॅड थांबल्यानंतर आता नव्याने शहरात काहींनी आपल्या मोटारींवर अशोकस्तंभ मुद्रित असलेले स्टीकर्स लावून पु्न्हा आमदार, खासदार म्हणून मिरवण्यास सुरवात केली आहे. खासदार किंवा आमदारांनीही आपल्या मोटारीवर अशोकस्तंभाचे स्टीकर्स लावणे बेकायदेशीर आहे. तसे राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (वाहतूक) स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरातील माझ्याशी सबंधित कुणीही हे बेकायदा स्टीकर्स लावू नयेत, असे आवाहन तथा कळकळीची विनंती आमदार लांडगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. शहरातील इतर दोन आमदारांनी मात्र, अद्याप असे आवाहन केलेले नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.