नगरसेवकांच्या पळापळीचा भाजपाला सर्वाधिक फटका वडगावशेरीत बसणार

भाजपा सोडणाऱ्या नगरसेवकांची संख्या तीसपेक्षा जास्त असू शकते.
sar29.jpg
sar29.jpg
पुणे : भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येबाबत वेगवेगळी चर्चा सध्या सुरू आहे. भाजपा सोडणाऱ्या नगरसेवकांची संख्या तीसपेक्षा जास्त असू शकते, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. सर्वच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे नगरसेवकांचा ओघ आहे. मात्र, भाजपा सोडणाऱ्यांमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असू शकते, असेही या सूत्रांनी सांगितले.

वडगाव शेरी मतदारसंघ भाजपाचे शहराध्यक्ष व या मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणे शहराध्यक्ष मुळक यांच्यासाठी योग्य ठरणार नाही. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एकुण 24 नगरसेवक आहेत. यातील 14 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत. 14 मधील काही अपवाद वगळता बहुसंख्यजण गेल्यावेळी राष्ट्रवादीतून आलेले आहेत. कॉंग्रेस व इतर पक्षातून आलेल्या नगरसेवकांची संख्या अत्यल्प आहे. महापालिकेची निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेतून भाजपात जाऊन नगरसेवक झालेल्यांची संख्या सुमारे साठ असल्याचे सांगितले जाते. यातील तीसहून अधिकजण राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले आहेत.

निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपल्याने अनेकांची घरवापसीची तयारी सुरू केली आहे. काहीजण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे तर काहीजण आमदारांमार्फत अजित पवार यांना भेटत आहेत. आतापर्यंत सात ते आठ जणांची थेट अजित पवार यांच्याशी भेट घालून देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत केवळ नाईलाज म्हणून अनेकजण भाजपात आल्याचे बोलले जाते. अशा नगरेसवकांची संख्या साठ असल्याचे सांगण्यात येते. या सर्वांचा मूळ पिंड भाजपाचा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा भाजपाशी त्यांचा काहीही संबंध नाही. चार जणांचा प्रभाग व चुकीच्या पद्धतीने केलेली प्रभाग रचना यामुळे राजकीय तडजोड म्हणून निवडणुकीच्यावेळी इतर पक्षातील नगरसेवक भाजपामध्ये गेले होते. राजकीय करिअर संपुष्टात येऊ नये यासाठी अनेकांनी त्यावेळी केवळ नाईलाजाने भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे अनेकजण पालकमंत्री अजित पवार यांना वैयक्तिकपणे भेटत आहेत. यातील अनेकांना अजित पवार नावाने ओळखतात. आधीच्या सत्तेच्या काळात अजित पवार यांनीच यातील अनेकांना महत्वाची पदे दिली होती. त्यामुळे या सर्वांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे या इच्छुकांची घरवापसी होण्यात फारशी अडचण नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्यांने सांगितले.

दरम्यान, नगरसेवकांची पळापळ रोखण्यासाठी भाजपाकडूनदेखील प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जे कच्चे दुवे आहेत. त्यांच्याशी पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर बोलायला सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसात अजित पवार यांना खरोखरीच कोण भेटले याचीही माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com