मेट्रोच्या तोट्याची जबाबदारी भाजप नेते घेतील का ? ; राष्ट्रवादीचा सवाल

महिनाभरात मेट्रोच्या प्रवाशी संख्येमध्ये तब्बल 90 टक्क्यांची घट झाली आहे.

मेट्रोच्या तोट्याची जबाबदारी भाजप नेते घेतील का ? ; राष्ट्रवादीचा सवाल
Ajit Gavanesarkarnama

पिंपरी : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर गाजावाजा करत अर्धवट मेट्रोचे उद्घाटन करुन भाजप (BJP) तोंडघशी पडला आहे. कारण महिन्याभरातच मेट्रोची प्रवासी संख्या तब्बल 90 टक्क्यांनी घटल्यामुळे मेट्रो तोट्यात जाऊ लागली आहे.

पिंपरीसह अनेक मेट्रो स्टेशन्सची कामे अर्धवट असतानाही पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ श्रेय लाटण्याच्या धडपडीत सर्वसामान्यांच्या त्रासात आणखीन भर घालण्याचे काम भाजपने केले.जनतेच्या पैशांमधून मेट्रोचा तोटा भरून काढावा लागणार असल्याने जनतेवर बोजा लादण्याचे पाप करणारे भाजप नेते मेट्रोच्या अपयशाचे श्रेय घेतील का ?अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane)यांनी आज (बुधवारी) केली.

Ajit Gavane
राष्ट्रवादीच्या आमदाराचे पक्षश्रेष्ठींनाच अल्टीमेटम ; वागणं सुधारा, अन्यथा वेगळा निर्णय घेणार

मेट्रोचे श्रेय घेण्याच्या भाजपच्या लबाडीवर गव्हाणेंनी हल्लाबोल केला. मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारची पन्नास टक्क्यांची भागीदारी आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोसाठी तब्बल 5 हजार कोटींहून अधिक निधी जानेवारी 2020 मध्ये दिला. त्यानंतर या कामाला गती मिळाली. राज्य सरकारने व विशेषत: अजित पवार यांनी अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. मात्र, त्याचा ‘इव्हेंट’कधीच केला नाही,असा टोला गव्हाणेंनी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगेंना त्यांचे नाव न घेता लगावला.

मेट्रोची सर्व कामे पूर्ण होऊन हा प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने महाविकास आघाडी सरकारकडून सर्वप्रकारची मदत करण्यात आली आहे. लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा तसेच त्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा यासाठी मेट्रो प्रकल्प असताना केवळ पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात सरकार असल्याच्या बळावर भाजपच्या नेत्यांनी कामे अर्धवट असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली. या घाईचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

Ajit Gavane
Silver Oak riot: सदावर्ते यांचा पाय खोलात, आणखी एक गुन्हा दाखल

अवघ्या महिन्यात मेट्रोच्या प्रवाशी संख्येमध्ये तब्बल 90 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या अतिघाईमुळे सामान्यांबरोबरच मेट्रो प्रकल्पही संकटात घातल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला. त्याच्या पुष्ठर्थ त्यांनी मेट्रो प्रवाशांची आकडेवारीच सादर केली.

भाजपच्या या स्टंटबाजीचा खरपूस समाचार घेताना गव्हाणे म्हणाले,''केवळ दिखाव्यासाठी आणि फुकटच्या स्टंटबाजीसाठी गल्ली ते दिल्ली इव्हेंटमध्ये व्यग्र असणार्‍या भाजप नेत्यांना सर्वसामान्य लोकांच्या त्रासाशी काहीही देणे-घेणे नसल्याचेच पुणे व पिंपरी-चिंचवडच्या अर्धवट मेट्रो सेवेवरून लक्षात येते. 13 मार्चला 67 हजारांपर्यंत गेलेला प्रवाशांचा आकडा एक महिन्यानंतर अवघा 5 हजारांवर आला. त्यात पिंपरी चिंचवडमधील प्रवासी केवळ 1 हजार 417 आहेत.

उद्घाटनावेळी गाजावाजा केलेल्या इ-रिक्षा, इ-बाइक आणि सायकलीचा नुसता फार्सच ठरला.केवळ दोन स्थानकांबाहेरच बाइक आणि सायकली दिसत आहेत. त्या ही कार्यान्वित नाहीत. धूळखात पडल्या आहेत. मेट्रो सुरू झाल्यानंतरही वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडीदरम्यान स्थानकांची कामे अपूर्णच आहेत.

साधे जिने, सरकते जिने, आणि लिफ्टची कामे, रंगरंगोटी, डागडुजी आदी कामे अर्धवट असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात तरबेज असणार्‍या भाजपच्या इव्हेंट बहाद्दर नेत्यांनी अर्धवट मेट्रो सुरू करून सर्वसामान्यांच्या डोक्यावर बोजा टाकण्याचे काम केले आहे. या नेत्यांना लोकांची खरोखरच काळजी आहे का? की केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडून असे स्टंट केले जातात, याचा सर्वसामान्य जनतेनेच विचार केला पाहिजे,असेही गव्हाणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.