
Jalgaon : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी जळगावात सभा झाली. त्यात त्यांनी भाजपसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या स्टाईलने सडकून टीका केली. त्यामुळे भाजपमच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या पद्धतीने ठाकरेंचा शेलक्या शब्दात समाचार घेत थेट आसाममधून हल्लाबोल केला.
आंतरवाली सराटीत (ता. अंबड, जि. जालना) शांततामय मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस लाठीमार करतील कसा अशी शंका उपस्थित करीत तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) करायला लावला, असा सनसनाटी आरोप ठाकरेंनी जळगावातील सभेत फडणवीसांचा नामोल्लेख न करता केला. त्यांनीच भाजप संपवली, टरबूल्या म्हणून उपस्थितांकरवीच त्यांची हेटाळणीही केली.
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे उदाहरण देताना भाजप (BJP) आणि त्यांच्या मातृसंस्थेला असे महापुरुष घडवता आले नाहीत. म्हणून ते दुसऱ्यांचे चोरायला लागलेत, असा तिखट वारही केला होता. त्यावरून भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आणि आक्रमक नेत्या वाघांनी शिवसेनेच्या वाघावर पुन्हा कडक शाब्दिक हल्ला केला. तसेही ते वाघांच्या निशाण्यावर मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या तिसऱ्या बैठकीपासून आले आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीसाठी वाघ (Chitra Wagh) या आसाममध्ये गुवाहाटीत आहेत. तेथून त्यांनी ठाकरेंवर ट्वीट करत हल्ला केला. ''उद्धवजी, अहो किती रडताय…प्रत्येक ठिकाणी पुन्हा तेच रडगाणे सुरूय. इकडे संपूर्ण जगाने मोदीजींच्या नेतृत्वांवर शिक्कामोर्तब केलेय. त्यामुळे तुमचा झालेला जळफळाट जळगावच्या सभेत दिसला'' ,असा पलटवार वाघांनी केला.
दुसऱ्यांचे महापुरुष चोरण्याच्या ठाकरेंच्या टिकेचाही वाघांनी समाचार घेतला. ''होय, देशाचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेलांचा वारसा पुढे नेत पंतप्रधान मोदीजींनी कश्मीरमधील 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला. जे 70 वर्षात कोणी करू शकले नाही ते, मोदीजींनी करून दाखवले. पोलादी पुरूषाचे हे लक्षण आहे. हा पुरूषार्थ…आहे'' असे त्या म्हणाल्या.
''तुमचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात आहे...तुमचा पुरूषार्थ पत्राचाळीतील भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालण्यात आहे…तुमचा पुरूषार्थ BMC लुटण्यात आहे…तुमचा पुरूषार्थ मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आहे…तुमच्या पुरूषार्थाच्या कथांची यादी न संपणारी आहे, उद्धवजी''….!अशी सरबत्ती वाघांनी ठाकरेंवर केली.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.