
Kasba By-Electon : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक जाहीर झाला आहे. २६ फेब्रुवारीला रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांनी झोकून दिले आहे. कसबा हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. हा किल्ला अभेद्य यासाठी भाजपने जंग जंग पछाडलेले आहे. यात विशेष बाब म्हणजे तब्बल पाच वेळा कसब्याचे आमदार राहिलेले गिरीश बापट (Girish Bapat) आजारपणात ही पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत. ते आजारी असताना, भाजपने त्यांना प्रचारासाठी आणल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता भाजपवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपला या मुद्द्यावरून लक्ष्य केले आहे. जगताप म्हणाले, “गिरीश बापट उद्यापासून प्रचारात उतरत आहेत. मुळातच त्यांची प्रकृती अस्वस्थ असताना भाजपने त्यांना प्रचारासाठी येण्याची गळ घातली आहे. गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांना भाजपने पक्षांच्या निर्णयापासून लांब ठेवले.
भाजपचे मेळावे, कार्यक्रम यामध्ये साधे त्यांचे फोटोही लावले नाहीत. मात्र आज कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली. हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे, असा घणाघाती टीका जगताप यांनी भाजपवर केली. गिरीश बापट यांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय, असे जगताप म्हणाले.
विजयी झाल्यावर पेढे भरवायला मी येणार :
एकीकडे असे आरोप प्रत्यारोप होत असताना, गिरीश बापट यांनी विजयी झाल्यावर पेढे भरवायला मी येणार असे म्हंटले आहे. बापट म्हणाले, १९६८ नंतर ही अशी पहिलीच वेळ आहे की, मी निवडणुकीत सक्रिय नाही. ही निवडणूक चुरशीची वगैरे नाही, या निवडणुकीत आपलाच पक्ष चांगल्या मताधिक्याने पुन्हा जिंकणार आहे.
कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे.कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा असतो. आपण मागील अनेक वर्ष या आत्म्याची सेवा करण्यातच धन्यता मानली आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार नक्कीच जिंकणार आहे. हेमंतचे काम चांगले पण, नागरिकांपर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्त्यांनी थोडी ताकद लावली पाहिजे. मी यातून बरा होऊन परत येणार आहे, आपला विजय झाल्यावर पेढे भरवायला मीच येणार, असा विश्वास बापटांनी व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.