आमदार सुनील टिंगरेंची श्रेयासाठी केविलवाणी धडपड : भाजपची टीका - bjp criticizes ncp mla sunil tingare for taking credit of bhama askhed project | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सुनील टिंगरेंची श्रेयासाठी केविलवाणी धडपड : भाजपची टीका

उमेश घोंगडे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

टिंगरे यांच्याकडून शून्य निधीची तरतूद केल्याचा आरोप 

पुणे : भामा-आसखेड प्रकल्प पूर्णत्वास येत असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या वडगावशेरीच्या विद्यमान आमदारांनी या प्रकल्पासाठी शून्य निधीची तरतूद केली. त्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्याची धडपड त्यांनी करू नये, अशी टीका पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मंगेश गोळे यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर भामा आसखेड पाणी योजना पूर्णत्वास जात असल्याचे सांगत मतदारांना दिलेले वचन पूर्ण केल्याचा दावा आमदार सुनील टिंगरे यांनी आज केला. यासाठी त्यांनी राज्य सरकार, उममुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अभारदेखील मानले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर शहर भाजपाने आक्षेप घेत आमदार टिंगरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

या संदर्भात भाजपाचे प्रवक्ते गोळे म्हणाले, " भामा-आसखेड प्रकल्पाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी 95 टक्के काम पूर्ण झाले होते. भाजपचे शहराध्यक्ष आणि वडगावशेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून, बैठका घेऊन या योजनेला गती दिली. स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी गेल्या वर्षी सुमारे 185 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्त गावांमध्ये विकासकामे झाली. जगदिश मुळीक यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना सुचना देऊन या वर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात आवश्‍यक असणारी तरतूद करण्यास सांगितले. त्यामुळे योजना पूर्णत्वास येत आहे. काही प्रकल्पग्रस्तांना हेक्‍टरी 15 लाख रुपये देऊन त्यांनी पुनर्वसन करण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. तशीच कार्यवाही निवडणुकीनंतर झाली आणि काम सुरू झाले. परंतु गेल्या वर्षभरात मतदारसंघात एकही विकासकाम करता आले नाही आणि शून्य निधीची तरतूद यामुळे निराश झालेले विद्यमान आमदार न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.''

गोळे म्हणाले, "सहा वर्षे सुरू असलेल्या योजनेचे एका वर्षात श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न विद्यमान आमदार करीत आहेत. परंतु ते नगरसेवक असलेल्या प्रभाग दोन मधील या योजनेअंतर्गत 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. टाकीचे बांधकाम करण्यासाठी आणलेले साहित्य चोरीला गेले आहे. टाकीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी नगरसेवक आणि आमदार या नात्याने त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यातून त्यांची निष्क्रियता लक्षात येते. त्यांनी आधी योजनेअंतर्गत आपल्या प्रभागातील टाकीचे काम पूर्ण करावे आणि नंतर न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा, टाकीचे काम पूर्ण झाले नाही तर या भागातील नागरिकांना पाणीच मिळणार नाही. अशा अडथळ्यांवर मात करीत भाजपाने हे काम पूर्णत्वास आणले असून, विद्यमान आमदारांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख