महापालिका आयुक्त राजेश पाटलांचा भाजप नगरसेविकेला झटका

आशा शेंडगे-धायगुडे यांनी गुरूवारी पालिका आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली होती.
महापालिका आयुक्त राजेश पाटलांचा भाजप नगरसेविकेला झटका
BJP Corporator Asha Shendge arrested by PCMC police

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या कामाबाबत प्रथम माझ्याशी चर्चा करा आणि मग ते सुरु करा, असा आग्रह भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे यांना धरला होता. त्यासाठी त्यांनी पिंपरी महापालिकेत गुरुवारी (ता. 9) आपल्या समर्थकांसह गोंधळ घालत शाईफेक केली. हे प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडले आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यात या नगरसेविकेसह दहाजणांना अटक झाली आहे. (BJP Corporator Asha Shendge arrested by PCMC police)

आशा शेंडगे-धायगुडे यांनी गुरूवारी पालिका आयुक्तांच्या नामफलकालाच नाही तर पालिकेचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्या दालनातही जाऊन त्यांची खुर्ची आणि टेबलावर काळी शाई टाकली होती. त्यांच्या टेबलवर धिक्कार असे शाईने लिहिले होते. त्यामुळे अधिकारी वर्ग घाबरून जाऊन त्यांच्यात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आयुक्तांनी तातडीने पोलिस कारवाई करण्याची खबरदारी घेतल्याची चर्चा आहे. 

उपमुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या व्हीसीसाठी चाललेल्या आयुक्तांना अडवल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नगरसेविका व त्यांच्या समर्थकांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता आंदोलन करून त्यावेळी कोरोना निर्बंधाचे पालन न करणे ही कलमेही आरोपींविरुद्ध लावण्यात आली आहेत. दरम्यान, शेंडगे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा विचार केला नसल्याचे आय़ुक्त पाटील यांनी या घटनेवर सांगितले. 

शेंडगे यांनी कासारवाडी येथील त्यांच्या प्रभागातील स्मार्ट सिटीचे काम अडवले होते. मात्र, ते वेळेत पूर्ण केले जाईल, असे त्यांना कालच सांगितले होते. त्यांच्या तक्रारीचे निवारण केले होते. तरीही त्या शाई घेऊन आल्या. त्यांना काय सिद्ध करायचे होते. त्यांच्याविरुद्ध सर्वच अधिकारी तक्रारी करतात. त्यांच्या प्रभागात कुणी काम करायला मागत नाही, याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा टोला आयुक्तांनी मारला आहे. 

नगरसेविकेसह पूजा अरविंद भंडारी (वय 25), शीतल पंकज पिसाळ (वय 21), गौरी कमलाकर राजपाल (वय 31), आशा जैस्वाल(वय 40), शीतल महेश जाधव (वय 36), जयश्री रामलिंग सनके (वय 33), संध्या रमेश गवळी (वय 47), स्वप्नील भारत आहेर (वय 21) आणि संजय शंकर पवार (वय 19, सर्व रा. कासारवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दुपारी न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. संजय शेडगे हा अकरावा आरोपी आहे. मात्र,त्याला अटक झालेली नाही.

Related Stories

No stories found.