पुणे : पुणे महापालिका हद्दीत 23 गावांचा समावेश करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका सत्तेतील शिवसेना व कॉंग्रेस या घटक पक्षांना मान्य नाही, असे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. सलगपणे अनेक वर्षे सत्ता हाती असूनही जिल्ह्यातील गावांच्या विकासातील अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी या विषयात आग्रही आहे. मात्र, महापालिकेत समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या गावातील ग्रामस्थांच्या बरोबर राहण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका राहील, असे शहराध्यक्ष मुळीक यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित 23 गावांतील ग्रामस्थांची याबाबतची भूमिका, नागरी समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी मुळीक यांनी शेवाळेवाडी येथून आज दौऱ्याला सुरवात केली. पुढील 15 दिवसांमध्ये सर्व 23 गावांना भेट देऊन मुळीक ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ""23 गावांच्या समावेशाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची अनेक वर्षे सत्ता असूनही सर्वच गावे विकासापासून वंचित राहिली आहे. आपले अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी महापालिकेत समवेशासाठी आग्रही आहे. मात्र उर्वरित घटक पक्ष या भूमिकेशी सहमत दिसत नाहीत.''
कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता गावांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. विकासासाठी आम्ही ग्रामस्थांबरोबर राहणार आहोत, असेही मुळीक यांनी सांगितले. जिल्ह्यात आणि शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेची प्रदीर्घ काळ सत्ता होती. या काळात शहरापासून जवळ असूनही विकासापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आता महापालिकेत समावेश करून आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे भासविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची टीका शहराध्यक्ष मुळीक यांनी केली. संघटनात्मक बांधणी करण्यासाठी या दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येत असून, संघटना सक्षम करण्यावर भर देत असल्याचे शहराध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.

