आमदार शेळकेंचा भाजपच्या बाळा भेगडेंना धक्का

भाजप आणि काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काॅेग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
आमदार शेळकेंचा भाजपच्या बाळा भेगडेंना धक्का
corporators join NCPsarkarnama

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लवकरच होऊ घातल्या आहेत. त्याच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) गुरुवारी (ता.२) मोठे इनकमिंग झाले. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजप (BJP) व कॉंग्रेसला धक्का देत त्यांच्या विद्यमान नगरसेवक व त्यांच्या समर्थकांना पक्षात आणले. या मुळे भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ विधानसभा निवडणुकीनंतर आता आणखी खिळखिळा झाला आहे. तर, राष्ट्रवादीला आगामी जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत शेळके यांनी सुरु केलेल्या या इनकमिंगचा मोठा फायदा होणार आहे.

corporators join NCP
राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; ठाण्यातील बड्या नेत्याने बांधले घड्याळ

मावळ तालुक्यातील नवनिर्मित देहू नगरपालिकेचीही निवडणूक होऊ घातली आहे. तिच्या तोंडावर श्रीक्षेत्र देहू गावचे माजी उपसरपंच व पूर्वाश्रमीचे भाजप समर्थक स्वप्नील काळोखे यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादीत मुंबईमध्ये प्रवेश केला. मावळसह ठाणे ग्रामीण आणि वाशीम जिल्ह्यातील अनेकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हातावर घड्याळ बांधले.

मावळातील लोणावळा नगरपरिषदेतील कॉंग्रेसच्या गटनेत्या, माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर तसेच भाजपचे माजी गटनेते व नगरसेवक भरत हरपुडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, सामाजिक कार्यकर्ते गणेश इंगळे यांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. तळेगावकर यांची नगरसेवकपदाची ही दुसरी टर्म आहे. त्या बांधकाम समिती सभापतीही होत्या. लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप व कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने या दोन्ही पक्षांना त्याचा फटका, तर राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

corporators join NCP
प्रकाश आंबेडकरांना धक्का; 23 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश प्रभावी ठरेल, असे अजित पवार यावेळी म्हणाले. पक्ष बांधणीसाठीही तो फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोचवा आणि एकजुटीने पक्ष बळकट करा, असे त्यांनी पक्षात प्रवेश केलेल्यांना आवाहन केले. तर, राष्ट्रवादीच्या कुटुंबात आपले स्वागत आहे, असे जयंत पाटील हे पक्षात आलेल्यांना उद्देशून म्हणाले. कार्यकर्त्यांची बूज राखणारा आमचा पक्ष आहे, असे सांगत पक्षनोंदणी जोरात राबविण्याचे आवाहन त्यांनी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.