
पाईट (जि. पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे आमदार दिलीप मोहिते (Dilip mohite) यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. हा भाजपसाठी धक्का मानला जात असून पाच वर्षांपूर्वी याच भागातून जिल्हा परिषदेला भाजपचा उमेदवार निवडून आला होता. आता झेडपी निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. (BJP Activist from Khed join NCP)
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आंभू, आंबोली आणि आखतूली गावच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम पट्ट्यात भाजपाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे वाशेरे गणाचे अध्यक्ष सुनील लोहोट, आभूचे माजी सरपंच विठ्ठल राजगुरव, उपसरपंच शिवाजी राजगुरव, बाबूराव राजगुरव, दत्तात्रय तुपे, दत्तू लोहोट, विलास राजगुरव, बाळू राजगुरव, रोहन शिंदे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.
जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक ,तालुका बाजार समिती,आणि तालुक्यातील बहूसंख्य सहकारी सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारून सत्ता काबीज केली आहे. पाच वर्षापूर्वीं याच पश्चिम भागातून भाजपचे अतुल देशमुख जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते.याचगटातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्टवादीत प्रवेश झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला असल्याची जोरदार चर्चा आहे.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास आमदार दिलीप मोहिते, सुरेखा मोहिते, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, मंगल चांभारे, माजी सभापती सुरेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,राष्ट्रवादी पश्चिम विभागाध्यक्ष नामदेव गोपाळे, किरण वाळुंज, आंभूचे सरपंच विनोद लोहोट, माजी सरपंच भागुजी राजगुरव, किसन मराठे, पाटीलबुवा काळोखे, संतोष लोथे, माऊली कांबळे, दत्ता काळोखे, माउली लोथे, माउली तुपे, चिंधू तुपे यांच्यासह अनेक पश्चिम भागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे व माजी सभापती सुरेश शिंदे यांनी सांगितले की, खेडचा पश्चिम पट्टा भाजपचा झाला असल्याची स्वप्न गेली चार पाच वर्षांपासून काहींना पडत होती. मात्र, पश्चिम पट्टा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या भागातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे आजदेखील उभी आहे. आगामी निवडणुकीतही हा भाग राष्ट्रवादीचा व आमदार मोहितेंचा कट्टर समर्थक असल्याचे दाखवून देतील यात शंका नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.