घोडगंगेंच्या सभेत पाचर्णे-पवार भिडणार   !

दादा पाटील का मौनात...? अ‍ॅड.अशोक पवार यांना कारखान्याचे उपाध्यक्ष असताना थेट विरोध करणारे त्यांचे तालुक्याच्या पूर्व भागातील नेते म्हणजे दादा पाटील फराटे. पुढील काळात दादा पाटील पाचर्णे यांच्या समवेत आले आणि त्यांनी आपला पवारांचा विरोधही कायम ठेवला. अर्थात साखर कारखानदारीची उत्तम माहिती असलेले दादा पाटील यांना पाचर्णे यांच्या शिफारशीनुसार भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्षपदही बहाल करण्यात आले. अशा स्थितीत सध्या मात्र दादा पाटील ना पाचर्णेंसोबत दिसत ना जाहिर कार्यक्रमात दिसतात. त्यांचे घोडगंगा कारखाना, अध्यक्ष अशोक पवार व आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याबद्दलचे सध्याचे मौन मात्र गुढ असून हे गुढ निर्णायक राजकीय घडामोडींच्या दिशेने सुरू असल्याची चर्चा तालुक्यात आहे.
pacharne Pawar.
pacharne Pawar.

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची उद्या (मंगळवारी) वार्षीक सर्वसाधारण सभा. केवळ कारखाना कारभार आणि ऊस उत्पादक शेतक-यांच्या दृष्टीनेच ही सभा महत्वाची असली तरी उद्या समोरासमोर उभे ठाकणार आहेत ते विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे आणि कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार अ‍ॅड.अशोक पवार हे दोघे.

 गेल्या तीन चार महिन्यात कारखान्याच्या वीज करारावरुन व कारखान्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याच्या मुद्द्यांवरुन दोघांचेही कागदी बाण जोरात चालले आहेत. मात्र आता उद्या दोघेही एकमेकांबद्दल काय बोलतात आणि कसे भांडतात त्याची उत्सूकता तालुक्याला राहणार आहे. 

अर्थात दोघेही नेते येत्या विधानसभेसाठी तुल्यबळ समोरासमोर उभे ठाकरणारे उमेदवार असणार आहेत. निवडणूकीपूर्वी संपूर्ण तालुक्याला आपला प्रभाव दाखवायला दोघेही उद्या बाह्या सारुन असणार आहेत आणि उद्याची लढाई केवळ पाचर्णे-पवार यांचीच नसून भाजपा-राष्ट्रवादी अशी पक्षीय राहणार हेही नक्की. 

  भाजपा सरकारने घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा वीज करार रखडला असून त्या साठी आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपूरावा करुन तो करवून घेत असल्याची भूमिका वीजकरार होण्यापूर्वी भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी जाहिर केली आणि करार होताच सरकारने कमी दराने वीजकरार केल्याने कारखान्याचा मोठा तोटा झाल्याची तक्रार अध्यक्ष व माजी आमदार अशोक पवार यांनी करायला सुरवात केली. 

यावर दोहींबाजुनी आरोपप्रत्यारोप झाले तर आमदार पाचर्णे यांनी सन २००९ पासून पावर यांनी सरकारकडे केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती जाहिर करण्याचेही आव्हान दिले. अर्थात  संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ विरुद्ध ० अशी जोरदार मुसंडी घोडगंगात मारलेल्या अ‍ॅड.अशोक पवार यांनी आपले खुप काही मुद्दे लगेच जाहिर न करता गुलदस्त्यात ठेवले आणि पाचर्णे यांच्या विरोधात ते जोरदार वापरणार हेही तालुका जाणून आहे. 

याच अर्थी उद्याची वार्षीक सर्वसाधारण सभा महत्वाची असून दोघेही आगामी विधानसभा निवडणूकीसाठीचे समोरासमोरचे उमेदवार असल्याने अशोक पवार आपली कुठली तोफ पाचर्णे यांचेवर वापरतात त्याची उत्सूकता उद्याच्या सभेच्या निमित्ताने असणार आहे. अर्थात होणार असलेली जुगलबंदी केवळ कारखाना कारभारापूरती मर्यादित नसणार हे नक्की. 

मात्र मोदी-जानकर फॅक्टर असतानाही आपण केवळ १० हजारांच्या फरकानेच पडल्याचे शल्य पवार यांना अद्यापही आहे. तेच शल्य आणि पुन्हा तालुक्याचे आमदार होण्यासाठीची त्यांनी सुरू केलेली तयारी या सगळ्या पार्श्वभूमिवर आमदार बाबुराव पाचर्णे पवारांची सर्व अस्त्रे कशी निष्प्रभ करतात आणि आपली कुठली अस्त्रे त्यांचेसाठी वापरतात त्याची उत्सूकता म्हणजेच उद्याची वार्षीक सर्वसाधारण सभा.

 मुळात  २१ विरुद्ध ०  असे  संचालक बलाबल असताना आपल्यावतीने शासन संचालक म्हणून अ‍ॅड.सुरेश पलांडे यांना कारखान्यात संधी पाचर्णे यांनी दिली. मात्र अत्यंत आर्थिक अडचणीच्या काळातच शासनाचे १ कोटी २७ लाख एवढे भागभांडवल शासनाला परत करुन अ‍ॅड.पवार यांनी केलेली पाचर्णे यांचेवरची कुरघोडीही उद्याच्या सभेत चर्चेला येणार हे नक्की. एकुणच विधानसभा-२०१९ अगदी तोंडावर येवू घातली असली तरी विधानसभेपूर्वी पाचर्णे-पवार या दोघांची एकमेकांना जोखण्याची ही राजकीय कुस्ती उद्या न्हाव-याच्या कारखाना रणांगणावर रंगणार हे नक्की. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com