बापट म्हणाले;सत्तेचे सोडा पुण्यात विरोधकांना शंभर उमेदवारदेखील मिळणार नाहीत - Bapat said: Opposition will not get even a hundred candidates in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

बापट म्हणाले;सत्तेचे सोडा पुण्यात विरोधकांना शंभर उमेदवारदेखील मिळणार नाहीत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

सध्या असलेल्या १०० जागांवरून आम्ही १०५ जगांवर भरारी मारू

पुणे : महापालिका निवडणुकीत कुणी कितीही ताकद लावली तरी भारतीय जनता पार्टी निश्‍चितपणे पुन्हा सत्तेत येईल. सध्या असलेल्या १०० जागांवरून आम्ही १०५ जगांवर भरारी मारू. मित्र पक्ष असलेल्या ‘आरपीआय’चा आकडादेखील पाचवरून दहावर नेऊ. विरोधक महापालिकेत सत्तेत येण्याच्या गप्पा मारत आहेत. खरेतर त्यांना शंभर उमेदवारसुद्धा मिळणार नाहीत, अशी टीका पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांनी आज पुण्यात केली.( Bapat said: Opposition will not get even a hundred candidates in Pune)  

‘पीएमपीएमएल’च्या १० रूपयात बससेवेचा शुभारंभ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना खासदार बापट यांनी पुन्हा सत्तेत येण्याचा विश्‍वास व्यक्त केला. खासदार बापट म्हणाले, ‘‘ सत्तेत येण्यासाठी विरोधी पक्षाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या साडेचार वर्षात पुणे महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून भाजपाने मोठी विकासकामे केली आहेत. त्याआधारे पुन्हा सत्तेत येण्यास अडचण नाही. कोरोनावरील लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजारात आणली म्हणून ती आम्ही घेणार नाही, असे काही विरोधक म्हणत होते. पुण्यात आता मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या मेट्रोत तरी विरोधक बसणार का?.’’

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, ‘‘ बापट यांनी महापालिकेत पुन्हा सत्तेत येण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. गेल्या साडेचार वर्षातील काम पाहता पुन्हा सत्तेत येण्याचा कौल पुणेकर देतील. त्यामुळे खासदार बापट तुमच्या मनासारखे होईल. मेट्रो आणि पीएमपी बससेवा इंटिग्रेटेड होणार आहे. त्यामुळे एकाच तिकिटात कोणत्याही पद्धतीने प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक वाहतूक चांगल्या दर्जाची असेल तर नागरीकांकडून त्याला नक्की प्रतिसाद मिळतो. उच्च द्रूतगती उन्नत मार्गावर (एचसीएमटीआर) नियो मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला तर त्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध होऊ शकेल.’’     

दहा रूपयात बससेवा ही योजना कल्पक आहे. अशा योजना आखल्या आणि त्या प्रभावीपणे राबविल्या तर नागरीक त्या उचलून धरतात. या उपक्रमातून पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.बससेवा अधिक चांगल्या प्रकारे चालण्यासाठी त्यास नागरीकांचा प्रतिसाद मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी बससेवेचे वेळापत्रक समजणे आवश्‍यक आहे. नव्या ‘ॲप’ची निर्मिती करून त्या माध्यमातून नागरीकांना बससेवेचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. 

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख