बापटांनी ‘पीएमआरडीए’’ आणलं; पण समितीत त्यांनाच स्थान नाही मिळालं - Bapat brought PMRDA; But he did not get a place in the committee | Politics Marathi News - Sarkarnama

बापटांनी ‘पीएमआरडीए’’ आणलं; पण समितीत त्यांनाच स्थान नाही मिळालं

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’’ची स्थापना झाली आहे.

पुणे : राज्य सरकारने पुणे महानगर विकास प्राधिकरणासाठी (PMRDA) महाराष्ट्र महानगर नियोजन समितीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat)  हे पालकमंत्री असताना त्यांनी ‘पीएमआरडीए’ची स्थापन करण्यात मोलाची भुमिका बजावली. मात्र. आता या समितीत खासदार बापट यांना स्थान देण्यात आलेले नाही. (Bapat brought PMRDA; But he did not get a place in the committee) 

या संदर्भातील गांभीर्य सांगत राज्य सरकारच्या निषेधाचे पत्रक पुणे भाजपाच्यावतीने काढण्यात आले आहे. राज्यामध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र, या तिन्ही पक्षांमध्ये एकजूट नाही. सातत्याने ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.सोमवारी राज्य सरकारच्या वतीने घोषित केलेल्या महाराष्ट्र महानगर नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे माने यांनी म्हटले आहे. 

 कॉँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात आमदार असताना गिरीश बापट यांनी विधानसभेत सातत्याने मागणी करत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी पुणे महानगर प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना करण्याचा विषय लावून धरला होता. मात्र, या प्राधिकरणाचे अध्यक्षपद कॉँग्रेसकडे असावे की राष्ट्रवादी कडे या वादात या विषयाला बगल दिली गेली. याच वादाच्या पार्श्वभूमीवर या वेळीही या समितीचे अध्यक्षपद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे न देता मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवले आहे. आम्हाला त्यांच्या अंतर्गत वादात पडण्याची आवश्यकता नाही. मात्र, या समितीमध्ये खासदार बापट यांचे नाव टाळून पुणेकरांचा अपमान केला आहे.   

राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएमआरडीए’ची स्थापना करून घेतली. यामुळे पुण्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला. ‘पीएमआरडीए’चे काम करत असताना नगररचनेसंदर्भात सर्व निर्णय घेण्यात आले. आज पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’ मार्फत सुरू आहे, रिंगरोडची आखणी सुरू झाली आहे, नियोजनबद्ध काम करण्याच्या आग्रहामुळे ‘पीएमआरडीए’च्या क्षेत्रात ‘डीपी प्लान’ पासून वेगवेगळी कामे सुरू झाली आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली हे काम झाले आहे. 

या नव्या पुणे महानगर समिती सदस्यांच्या नियुक्तीमध्ये ‘पीएमआरडीए’ची स्थापना करण्यासाठी आग्रह धरून, अनेक विकसकामांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या खासदार बापट यांचे नाव नाही. मात्र, ज्यांचा पुण्याशी संबंध नाही अशा राज्यसभा सदस्य असणाऱ्या संजय राऊत तसेच तानाजी सावंत यांच्या नावाचा समावेश आहे. खासदार बापट यांना पुणेकर जनतेने विक्रमी मताधिक्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.त्यामुळे याची अधिसूचना काढताना ही चूक दुरुस्त करून खासदार बापट यांना या समितीमध्ये स्थान द्यावे अशी मागणी ही सुनील माने यांनी केली आहे.

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख