निवडणुकीत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही : पुण्याचे अधीक्षक देशमुख यांचा इशारा - any kind of misbehavior will not be tolerated in election | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही : पुण्याचे अधीक्षक देशमुख यांचा इशारा

उमेश घोंगडे
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

पुणे जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान आज (ता.१५) होत आहे.

पुणे : जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान आज (ता.१५) होत आहेत. निवडणुका सुरळित पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणेने पुरेशी काळजी घेतली असून जिल्ह्यात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. या शिवाय ‘एसआरपी’च्या पाच प्लॅटून, दीड हजार होमगार्ड व साडेपाचशे विशेष पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून संवदेनशील गावांमध्ये विशेष काळजी घेण्यात येणार आली असून सुमारे चारशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देशमुख यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षेचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. आधीचा अनुभव लक्षात घेऊन संवेदनशील गावांमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. शिरूर व मावळ तालुक्यांमधील काही गावांचा यात समावेश आहे. प्रचाराच्या काळात एक-दोन अपवाद वगळता कुठेही मोठी घटना घडलेली नाही. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व लोकशाही मार्गाने पार पडावी यासाठी काळजी घेण्यात येत आहे. गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व हॉटेल व ढाबे तीन दिवसांसाठी रात्री दहानंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिऱ्यांनी काढले आहेत. गावगुंडांचा वापर निवडणूक काळात होऊ नये यासाठी अशा ४०० जणांवर प्रतिबिंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निवडणुकीत होणारा संभाव्य गोंधळ, दमबाजी व गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत झाली आहे.’’

निवडणुकानंतर होणाऱ्या मतमोजणी व विजयी मिरवणुकीवरून गावागावांमध्ये भांडणे होतात. हे टाळण्यासाठी विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.विजयी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर होणारी विजयी मिरवणूक हे बऱ्याचदा भांडणाचे कारण असते. त्यामुळे विजयी मिरवणुकीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. उद्याचे मतदान व त्यानंतर होणारी मतमोजणी या काळात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार असून कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अधीक्षक देशमुख यांनी दिला आहे.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख