...आणि तिच्यातील आईने घेतले रौद्ररुप ! 

ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या तीन महिन्यांच्या बाळाला परिचारिकेचा गणवेश घालूत आलेल्या एका महिलेने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी घडला
sassoon.jpg
sassoon.jpg

पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या तीन महिन्यांच्या बाळाला परिचारिकेचा गणवेश घालूत आलेल्या एका महिलेने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी घडला होता. याबाबत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी त्यांचे काम सुरू केले. मात्र डोंगराऐवढे संकट कोसळले असतानाही बाळाच्या आईने धीर सोडला नाही, रिक्षातून तिचा पाठलाग केला आणि दोन तासातच महिलेस चंदननगर परिसरात गाठून बाळाची सुखरुपपणे सुटका केली. त्यानंतर तिला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संबंधीत महिलेस तपासासाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.(... and her mother took action)  

या प्रकरणी वंदना मल्हारी जेठे (वय 24, रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कासेवाडी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिला तिचे तीन महिन्यांचे बाळ श्‍वेता हिला घेऊन दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. त्यावेळी महिलेची मैत्रीणही तिच्या बाळाला घेऊन तिच्यासमवेत दवाखान्यात आली होती. महिलेची मैत्रीण तिचे पती आजारी असल्यामुळे गेली. फिर्यादी महिला ससूनमधील वॉर्ड क्रमांक 74 मध्ये येथे थांबल्या होत्या. त्यावेळी परिचारिकेसारखा गणवेश घातलेली महिला तिच्याकडे आली. तिने फिर्यादी महिलेस तुमच्या नातेवाईकांनी बोलावले आहे, तुम्ही जा मी बाळाला सांभाळते, असे संगितले. ती महिला परिचारिका असल्याचे समजून फिर्यादीने त्यांच्या बाळाला तिच्याकडे विश्वासाने सोपविले. त्यानंतर त्या त्यांना भेटण्यासाठी कोण आले आहे, हे पाहण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी आजूबाजुला पाहीले, तेव्हा त्यांना कोणीही नातेवाईक आढळले नाहीत. त्यामुळे त्या तत्काळ वॉर्डमध्ये परतल्या. तेव्हा त्यांना संबंधीत परिचारीका व त्यांची मुलगी तेथे आढळून आली नाही. अचानक घडलेल्या या घटनेनंतर फिर्यादीने हंबरडा फोडला. त्यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी व सुरक्षारक्ष तेथे धावून आले. महिलेने घडलेली घटना सांगितल्यानंतर रुग्णालय प्रशासनानेही तत्काळ बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली. 

...आणि तिच्यातील आईने घेतले रौद्ररुप ! 
फिर्यादी महिलेने या घटनेनंतर तत्काळ रुग्णालयाबाहेर येऊन बाळ घेऊन पळालेल्या महिलेच्या रिक्षाचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी महिलेने मोबाईलवरुन तिच्या नातेवाईकांना घडलेली घटना सांगितल्याने नातेवाईकही सतर्क होऊन तिच्या मदतीसाठी धावले. दरम्यान, एक ते दोन तास हा पाठलाग सुरू असताना संबंधीत रिक्षा चंदननगर येथे पकडली. त्यानंतर त्यातील महिलेला फिर्यादी महिला व तिच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी तिच्याकडील बाळाला ताब्यात घेतल्यानंतर महिलेच्या अश्रूंचा बांध फुटला. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक वंदना सपकाळे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून या तपास कामात महत्वाची जबाबदारी पार पाडली. दरम्यान, ससून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सुचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. 
रिक्षावाल्याची ओळख आली कामी ! 
फिर्यादी महिला प्रवास करीत असलेल्या रिक्षाचालकाचा बाळ पळवून नेणारा रिक्षाचालक ओळखीचा होता. त्यामुळे त्याने संबंधीत महिलेस बोलण्यात गुंतवून रिक्षा हळूहळू नेण्यास सांगितले. त्यानुसार, पुढील रिक्षाचालकानेही त्याची रिक्षा संथगतीने घेऊन अप्रत्यक्षरीत्या मदतीचा हात दिला. 
मुल होत नव्हते म्हणून केले अपहरण ! 
संबंधीत महिला गृहीणी असून तिच्या लग्नास सात वर्ष झाली आहेत. मात्र तिला अद्याप मुल झाले नाही. त्यामुळे तिने ससूनमधून बाळ पळवून नेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com