
Automated Multi-modal Biometric Identification System
पुणे : आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि दोष सिद्धीसाठी आता महाराष्ट्र पोलीस नव्या प्रणालीचा वापर करणार आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते 'ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम' (AMBIS) या संगणकीय प्रणालीचे उदघाटन करण्यात आले.
ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित एएमबीआयएस प्रणालीद्वारे केवळ बोटांचे ठसेच नाही तर तळवे चेहरा व डोळे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवता येणार आहेत. राज्यातील पोलीस दलाकडून या यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोष सिद्ध करण्याच्या प्रमाणात वाढ होईल, असे मत रितेश कुमार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) सुरेश मेखला,पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक संजय शित्रे, पिपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक ए.डी. शिंदे, श्री देशपांडे उपस्थित होते.
- अशी आहे एएमबीआयएस प्रणाली
पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशावरून आरोपीची ओळख पटवली जायची. मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. एएमबीआयएस प्रणालीत आरोपींच्या बोटांचे ठसे, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजीटल स्वरुपात साठवून ते इतर छायाचित्रांशी जुळविण्याची क्षमता आहे.
पोलीस ठाणे स्तरापर्यंत 'एएमबीआयएस' यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे. एएमबीआयएस' यंत्रणेअंतर्गत सुमारे६.५ लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपींचा अहवाल संगणकीकृत करण्यात आलेला आहे. एएमबीआयएस प्रणाली ही भविष्यात सीसीटीएनएस, प्रिझम, सीसुटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील एनएएफआयएस या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व पोलीस ठाणे, परिक्षेत्रीय कार्यालये, पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस मुख्यालय, अंगुली मुद्रा केंद्र, प्रशिक्षण केंद्र व मध्यवर्ती कारागृह याठिकाणी एएमबीआयएस प्रणालीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. यासाठी इंटरपोल आणि एफबीआय येथे हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यात अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रिकेची ऑनलाइन नोंदणी करुन त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे. एएमबीआयएस प्रणालीतंर्गत दिलेल्या पोर्टेबल एएमबीआयएस या यंत्रणेच्या वापराने गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिंटद्वारे काही मिनिटातच गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य झाले आहे.
एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून यंत्रणेची गती व अचुकता यामुळे ती इतर प्रणालीपासून वेगळी ठरते. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी एएमबीआयएस यंत्रणा महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. 2020 पासून एप्रिल 2022 पर्यंत 52 केसमध्ये 2.14 कोटींच्या चोरीस गेलेल्या मालमत्तेच्या प्रकरणात आरोपींचा शोध लावण्यासाठी एएमबीआयएस प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात आली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.