सुप्रियाताईंसमोरच अजितदादा मुर्दाबादच्या घोषणा! - ambil odha protesters raise solgans about ajit pawar in front of supriya sule | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

सुप्रियाताईंसमोरच अजितदादा मुर्दाबादच्या घोषणा!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

आंदोलन करणाऱ्या रहिवाशांना भेटण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे गेल्या असता मोठा गोंधळ झाला. 

पुणे : शहरातील आंबील ओढा  (Ambil Odha) झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईवरुन मोठा गदारोळ उडाला होता. या कारवाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या रहिवाशांना भेटण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या गेल्या असता मोठा गोंधळ झाला. या आंदोलनात सहभागी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच (Ajit Pawar) विरोधात घोषणाबाजी सुरू केली.  

आंबील ओढ्याच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आज आंदोलन करण्यात आले. सुमारे १३० घरांवर कारवाई केली जाणार असल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनकर्त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट दिली. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुळे यांना पाहताच घोषणाबाजी सुरू  केली. अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, अशा घोषणा देण्यास त्यांनी सुरवात केल्याने गोंधळ निर्माण झाला. 

सुप्रिया सुळे यांनी या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून बाधित महिला तथा आंदोलकांशी बोलू देण्याची विनंती केली. परंतु, पदाधिकाऱ्यांनी आणखी गोंधळ करण्यास सुरवात केली. अजित पवारांनीच ही कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. बिल्डरही अजित पवारांच्या जवळ असल्याने आम्हाला न्याय द्या, अशी मागणीही त्यांनी केली . याबाबत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या की, कशाच्या आधारावर हे आरोप करताहेत, याचे सगळे पुरावे मला द्या. मी स्वतः त्याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल करेन. 

आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु केल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. तसेच एका संघटनेच्या कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. विशेषतः पावसाळ्यात घरे पाडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा : कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनची नो एंट्री 

नागरिकांच्या संतापाची दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार तातडीची बैठक घेण्यात आली होती. बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, झोपू प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र निंबाळकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन त्याबाबतचे आदेश पुणे महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, या तोडकामाला न्यायालयानेही ७ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. हा प्रश्न शासकीय स्तरावर प्रश्न सोडवावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख