Laxman Jagtap Death : शेतकरी पुत्र ते पिंपरीचिंचवडचे कारभारी; लक्ष्मण जगतापांचा थक्क करणारा प्रवास !

Laxman Jagtap Death : शरद पवार यांचे कट्टर समर्थक ते फडणवीसांचे निष्ठावंत कार्यकर्ते...
MLA Lakshman Jagtap|
MLA Lakshman Jagtap|Sarkarnama

Amazing journey of Laxman Jagtap : भाजपाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आहे. शेतकरी पुत्र ते आमदार अशी दैदिप्यमान कारकीर्द त्यांची राहिली. जगताप यांचा जन्म पिंपळे गुरव येथील शेतकरी कुटुंबात १५ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरु झालेली राजकीय वाटचाल नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य, विधानसभा आमदारकीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१८ च्या मंत्रिमंडळ विस्तारात लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. पण, त्यावेळी मंत्री पदाने त्यांना हुलकावणी दिली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सरकार स्थापन झाले असते तर, जगताप यांना मंत्रिपद नक्कीच मिळाले असते, अशी आजही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षापासून सुरू झाली होती. १९८६ च्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ते प्रथम नगरसेवकपदी निवडून आले होते.‌ त्यावेळी दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे त्यांचे राजकीय गुरु होते. १९९२, १९९७ व २००२ च्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ते निवडून आले. त्यांनी महापालिकेत सलग २० वर्षे नगरसेवक म्हणून पिंपळे गुरवचे लोकप्रतिनिधीत्व केले.१९९३-९४ मध्ये ते महापालिका स्थायी समिती अध्यक्ष होते. कॉंग्रेसच्या काळात त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळवून देण्यात कॉंग्रेसचे नेते व तत्कालीन मंत्री अनंत थोपटे यांचा मोलाचा वाटा होता.

MLA Lakshman Jagtap|
Chandrakant Patil: संभाजी महाराजांवरील 'त्या'वादग्रस्त विधानावरून चंद्रकांतदादांनी आव्हाडांना सुनावलं; म्हणाले...

महापौरपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख झाली. १९९९ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. महापौर झाल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविले.

२००४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून पुणे जागेसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळविला.

MLA Lakshman Jagtap|
Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतरावरुन भाजपमध्येच वाद; सुजय विखे, पडळकर आमने- सामने

पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला आणि युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला गेला होता. त्यामुळे बंडखोरी करत जगताप यांनी चिंचवड मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली व विजय खेचून आणला. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेसशीच संलग्न राहिले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न स्विकारता त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळविला. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

MLA Lakshman Jagtap|
Laxman Jagtap Death News: पिंपरी चिंचवडमधील भाजपचं झुंजार नेतृत्व हरपलं; आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

भाजपतर्फे २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला. जगताप यांनी २०१६ मध्ये भाजपचे शहराध्यक्ष पद भूषविले. जगताप यांनी अगोदर अपक्ष आमदार महेश लांडगे व नंतर माजी महापौर आझम पानसरे यांचा भाजपात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घडवून आणला.

त्यांच्या शहराध्यक्षपदाच्या काळात २०१७ ची महापालिका निवडणूक आमदार जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि ऐतिहासिक विजय भाजपने मिळवला. १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवली. तर; अपक्ष ५ नगरसेवकांचा पाठिंबा मिळविला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.

शरद पवार यांचे कट्टर समर्थक ते फडणवीसांचे निष्ठावंत कार्यकर्ते...

राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक होते. म्हणूनच त्यांनी शरद पवार यांचा आदर्श बाळगून एका मुलीवरच ते थांबले. तसेच त्यांच्या महिलांच्या उन्नती व उत्कर्षासाठी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानला त्यांनी प्रतिभा असे नाव आवर्जुन दिले होते. भाजपात गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी, अशी आमदार जगताप यांची ओळख होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in