`सारथी`बद्दल सतत तक्रार करणाऱ्या वडेट्टीवार यांनी `महाज्योती`चीही वाट लावली..`

महाज्योती (Mahajyoti) या संस्थेचे उपक्रम आपल्याच मतदारसंघात राबविल्याचा वडेट्टीवार यांच्यावर ठपका
`सारथी`बद्दल सतत तक्रार करणाऱ्या वडेट्टीवार यांनी `महाज्योती`चीही वाट लावली..`
Vijay Wadettiwar - MahajyotiSarkarnama

पुणे : ओबीसी कल्याण खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) सध्या `महाज्योती` (Mahajyoti) या संस्थेच्या कारभारावरून वादात सापडले आहेत. त्यांच्याच एकट्याच्या विधानसभा मतदारसंघात योजना राबविल्याचा ठपका संस्थेवर ठेवण्यात येत आहे. वडेट्टीवार यांनी या संस्थेची वाट लावल्याची टीका आता मराठा महासंघाने केली आहे. तर महाज्योतीला बदनाम करू नका, असे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिले आहे.

याबाबत मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की शासनाची कोणतीही सार्वत्रिक योजना एका स्वतःच्या मतदारसंघात राबवता येत नाही. मराठा समाजाच्या तरुणांसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या नावाने वडेट्टीवार हे सातत्याने तक्रार करत होते. ते अजूनही `सारथी`ची चौकशीच करीत आहेत. सारथी सुरु झाल्यापासून ७ महिन्यांत १७ उपक्रम सुरु झाले व २२ उपक्रम शासनाच्या मान्यतेला पाठविले होते . ते त्यांना पाहवले नाही. UPSC परीक्षेसाठी `सारथी`ने जे २२५ विद्यार्थी दिल्लीत प्रायोजित केले होते त्याला वडेट्टीवारांनी विरोध केला. त्यातील २२ विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेत यश संपादन केले, हे मात्र त्यांनी दुर्लक्षित केले.

Vijay Wadettiwar - Mahajyoti
मुंबै बॅंकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे; शिवसेना-राष्ट्रवादीचा दरेकर-लाड जोडीला चकवा

महाज्योती संस्था स्थापन होऊन स्वतः अध्यक्ष व स्वायत्तता असलेल्या महाज्योतीला एकही प्रभावी उपक्रम सुरू करता आला नाही. एवढेच नाही तर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक आणि पुरेसे मनुष्यबळ देखील देता आले नाही. आपल्या मतदारसंघातील योजना त्यांनी खरे तर त्यांच्या बहुजन कल्याण किंवा कृषी विभागाकडून राबविणे आवश्यक आहे. अशा योजना महाज्योतीमार्फत स्वतःच्या जिल्ह्यात व मतदारसंघात राबवून ‘महाज्योती’सारख्या एका चांगल्या उपक्रमाची वाट लावण्याची मुहूर्तमेढ ते स्वतः रचत आहेत. यासारखे दुर्दैव नाही, असे कोंढरे यांनी म्हटले आहे.

Vijay Wadettiwar - Mahajyoti
आता `ओबीसी`ची मागणी; महाज्योती संस्थेला निधी द्या!

महाज्योती विरोधात येणाऱ्या मतांबद्दल वडेट्टीवार यांनीही खुलासा दिला आहे. महाज्योतीच्या उद्देशिकेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी उपक्रम राबविण्याचा समावेश आहे. त्यामुळं सात जिल्ह्यांतील कोरडवाहू 6 हजार 949 शेतकऱ्यांना करडई तेलबियाचं मोफत बियाणे देण्यात आले होते. 16 हजार 162 एकरवर या करडईची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. करडई तेलाला मोठी मागणी आणि चांगला भाव आहे. त्यामुळं यातून कोरडवाहू शेतकरी संपन्न व्हावा, हा महाज्योतीचा उद्देश असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या माध्यमातून तेलबिया उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन केलं जातंय, यातून शेतकरी आणि त्या माध्यमातून ओबीसी (OBC) तरुणांना ही रोजगार मिळेल, असं वडेट्टीवर यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांसाठी जेईई आणि नीट (JEE and NEET) परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे, पायलट प्रशिक्षण याशिवाय इतर उपक्रम राबविण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in