IPS कृष्ण प्रकाश यांच्याविरोधात पत्र व्हायरल : दोनशे कोटींची वसुली केल्याचा दावा

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्त असताना कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांचे अनेक कारनामे या पत्रात मांडण्यात आले आहेत.
IPS Krishna Prakash
IPS Krishna PrakashSarkarnaam

पुणे : मि. क्लिन म्हणून प्रतिमा असलेले IPS पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) हे चांगलेच गोत्यात आले आहे. त्यांच्या प्रतिमेला तडा जाणारे पत्र व्हायरल झाले असून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त त्यांनी दीड वर्षांच्या कालावधीत वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस दलातच नव्हे,तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली आहे. (IPS Krishna Prakash Latest News)

या पत्रातील दाव्यानुसार या अवैध वसूलीत चार एसीपी आणि चार पत्रकार यांचाही हातभार आहे. आपले काळेधंदे उघड होऊ नयेत,तसेच आपली प्रतिमा उंचावलेली ठेवण्यासाठी या पत्रकारांना दरमहा लाखो रुपयांची बिदागी दिली जात असल्याचा आरोप `लेटरबॉम्ब`मध्ये करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील आयुक्तांच्या कारभाराबाबत वक्तव्ये करणारी पत्र व्हायरल होण्याचा परंपरा कायम राहिली आहे. या आधीच्या आयुक्तांबाबतही अशीच पत्रे व्हायरल झाली होती. कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदावरून व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याआधीच त्यांच्यावर वार करण्यात आले आहेत. या पत्रामागे पोलिस दलातील वैमनस्य तर कारणीभूत नाही ना, अशीही चर्चा आहे.

IPS Krishna Prakash
मुदतपूर्व बदलीनंतर IPS कृष्ण प्रकाश पोहचले शरद पवारांच्या दरबारात

कृष्ण प्रकाश यांचे रिडर (वाचक) म्हणून काम केलेले एपीआय (सध्या नेमणूक पिंपरी पोलिस ठाणे) डॉ. अशोक डोंगरेंच्या नावाने व सहीने हे पत्र मुख्यमंत्र्यांना गेल्या महिन्याच्या २१ तारखेला पाठवण्यात आलेले आहे. मुंबईत वरिष्ठांच्या कानावर हा सगळा प्रकार घालूनही त्यांनी त्याची दखल न घेतल्याने आपल्याला ही माहिती देत असल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच ते मी लिहिलेच नाही, असा दबाव माझ्यावर येऊ शकतो,असा उल्लेखही या पत्राच्या शेवटी आहे.

प्रत्यक्षात डोंगरे यांनी हे पत्र आपण लिहिले नसल्याचा दावा एपीआय डोंगरेंनी केला आहे. ते लिहून बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी आज (ता.६) पोलिस आय़ुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

कृष्ण प्रकाश यांच्या जागी बदली होताच अंकुश शिंदे यांनी एपीआय डोंगरेच नाही, तर कृष्ण प्रकाश यांच्या आय़ुक्तपदाच्या काळात पीआरओ असलेले पीआय मनीष कल्याणकर यांचीही वाहतूक या दुय्यम शाखेत बदली करण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांनी स्थापन केलेले सामाजिक सुरक्षा हे वादग्रस्त ठरलेले खास पथकही नवीन आयुक्तांनी आल्या आल्या बरखास्त केले आहे. डोंगरे या पथकाचे प्रमुख होते.

IPS Krishna Prakash
कृष्ण प्रकाश यांच्या नावे महिला पोलिसाकडे मागितली खंडणी; `गूगल पे` ने सापडला जाळ्यात

या कथित पत्रातील दाव्यानुसार शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने अनेक गुन्हे दाखल होऊन प्रशासक नेमण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील सिंधी व्यापाऱ्यांच्या सेवाविकास को ऑपरेटीव्ह बॅंकेच्या तत्कालीन सर्व संचालक मंडळाला अटक करण्याचे आदेश असताना एका संचालकाकडून साडेतीन कोटी रुपये घेऊन त्याला अटक करण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

काही महिलांनाही नको ती कामे करावी लागल्याचा खळबळजनक आऱोप या पत्राव्दारे करण्यात आला आहे. पोलिस आय़ुक्तांच्या सांगण्यावरून तीन मराठी दैनिकांसह न्यूज चॅनेलचा एक अशा चार पत्रकारांना महिन्याचे पाकिट द्यावे लागत होते. त्यांना आतापर्यंत तीस लाख रुपये रुपये दिल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यात एकाने पाच लाख, तर दुसऱ्याने सात लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, दैनिकाच्या तिसऱ्या पत्रकाराने अनेक प्रकरणात व त्यांच्या तपासात हस्तक्षेप करीत पैसे घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्यांचाही उल्लेख या पत्रात असून ते पण कृष्ण प्रकाश यांच्या जवळिकीचा फायदा घेत असल्याचे यात म्हटले आहेत.

केपींनी पूर्वी काम केलेल्या मुंबई, नगर,सांगली, उस्मानाबाद येथूनही काही जणांना जमिनींच्या डिलसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आणले जात होते. त्यासाठीही एका चॅनेलच्या पत्रकाराची मदत झाल्याचा दावा केला गेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांगण्यावरून स्थानिक लोकप्रतिनिधींना फायद्याचे होतील,असे चुकीचे जमिनीचे व्यवहार झाले असून ते उघड होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यात बळीचा बकरा मला केला जाणार असून माझ्या जीवालाही धोका असल्याची भीती या तथाकथित पत्रात एपीआय डोंगरे म्हणवणाऱ्याने व्यक्त केली आहे. या चुकीच्या व्यवहाराचे पुरावे,ऑडिओ आपल्याकडे आहेत, असा दावा त्याने यात केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com