आकांक्षाने उंचावली पिंपरी-चिंचवडकरांची मान, पटकावला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय सन्मान

यावर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) काल (ता.२२) दिल्लीत जाहीर झाले.
Akanksha Pingle
Akanksha Pinglesarkarnama

पिंपरी : यावर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) काल (ता.२२) दिल्लीत जाहीर झाले. त्यात सर्वोत्कृष्ट बालकलाकाराची मानकरी पिंपरी-चिंचवडकर (Pimpri-Chinchwad) आकांक्षा पिंगळे (Akanksha Pingle) ठरली. त्याबद्दल तिच्यावर काल रात्रीपासून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. सुमी या मराठी बालचित्रपटातील भुमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. पहिल्याच सिनेमासाठी तो मिळाल्याबद्दल तिने 'सरकारनामा'शी बोलताना अतीव आनंद व्यक्त केला.

नुकतेच दहावीच्या परीक्षेतही आकांक्षाने असेच घवघवीत यश (८४ टक्के गुणे) मिळवलेले आहे. वडिलांसह कुटुंबाला या पुरस्काराचे श्रेय तिने दिले. अभ्यास आणि अभिनय या दोन्हींवर लक्ष देणार असल्याचे तिने सांगितले. ती मूळची खेड तालुक्यातील (जि.पुणे) कोहिंडे बुद्रूक गावची आहे. तेथूनही तिच्यावर कालपासून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झालेला आहे. तिचे वडील लक्ष्मण पिंगळे हे एका खासगी कंपनीत कामाला असून आई गृहिणी आहे.

या दोघांकडेही आपल्या मुलीच्या कौतुकाला शब्द नव्हते. एवढा आनंद झाला आहे, की तो शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असे हे दोघेही म्हणाले. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील आकांक्षा ही मोठी, तर आराध्या लहान आहे. सुमी या ग्रामीण भागातील मुलीची शिक्षणासाठीची धडपड आणि अखेरीत तिने साध्य केलेले तिचे ध्येय हे सुमी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यातील सुमिची भुमिकी मी केली आहे, असे आकांक्षा हिने सांगितले.

`सिंघम` मधील सोनालीच्या भुमिकेने कलाटणी दिली `सुमी` तथा आकांक्षाला

`सिंघम` या सुपरहिट हिंदी सिनेमात काम केलेली मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे तिसरीत असताना आकांक्षाने म्हटलेले डायलॉग ऐकून तिचे वडिल प्रभावित झाले. त्यांना आपल्या मुलीमधील स्पार्क समजला आणि तिच्यातील या सुप्त कलागुणांना त्यांनी वाव देण्याचे ठरवले. रांजणगावच्या गणपतीवर पहिली स्क्रिप्ट तिला मिळाली. यूट्यूबवर २००९ ला नऱ्या या लघूपटापासून तिची सुरवात खऱ्या अर्थाने झाली. नंतर तिने स्वराज्यरक्षक संभाजी व आणखी एका मालिकेत काम केले.

तर, आता तिने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावला. आपल्या अभिनयातील चुणूक तिने पहिल्याच सुमी या बालचित्रपटातून राष्ट्रीय स्तरावर दाखवून दिली. 'सुमी'ला एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट, तर तो ठरलाच. शिवाय सर्वेोत्कृष्ट बालकलाकार (मुलगी) आकांक्षा आणि (मुलगा) दिव्येश इंदूलकर हे ठरले. सुवर्णकमळही या चित्रपटाने पटकावले आहे, अशी माहिती लक्ष्मण पिंगळे यांनी दिली.

आकांक्षा ही पिंपरीत संत तुकारामनगर येथे राहते. हा प्रभाग माजी महापौर योगेश बहल यांचा आहे. आपल्या प्रभागातील मुलीने राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याचे कळताच काल रात्रीच ते आकांक्षाच्या घरी गेले. पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) माजी शहराध्यक्ष व विरोधी पक्षनेते राहिलेले बहल हे सध्या मुख्य प्रवक्ते तथा समन्वयक आहेत. राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वर्षा जगताप आणि तसेच स्थानिक माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनीही आकांक्षाची भेट घेऊन तिचे अभिनंदन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in