राष्ट्रवादीची मोठी तयारी! सहाशे जणांची जम्बो शहर कार्यकारिणी अजितदादा जाहीर करणार

महापालिका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी प्रथमच देणार प्रत्येक प्रभाग आणि वॉर्डालाही अध्यक्ष
राष्ट्रवादीची मोठी तयारी! सहाशे जणांची जम्बो शहर कार्यकारिणी अजितदादा जाहीर करणार
Ajit Pawar NCP Sarkarnama

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहरात भाजपचं (BJP) बूथ सक्षमीकरण सुरु आहे. त्यासाठी शहरातील भाजपच्या तेराशे बूथप्रमुखांचे संमेलन हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या रविवारी (ता.५) घेणार आहे. त्यापासून बोध घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) प्रभाग आणि वॉर्ड रचनेवर भर देण्याचे ठरवले आहे. प्रभाग तथा वॉ़र्ड सक्षमीकरणावर भर देणारी सहाशे जणांची जंबो शहर कार्यकारिणी राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत उद्या (ता.३) जाहीर केली जाणार आहे. (PCMC Election News Updates)

`आरएसएस`च्या बूथ बळकटीकरणाच्या रणनीतीला जशास तसे उत्तर देण्यासाठी आणि पिंपरी महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. भाजपला जशास तसे उत्तर नव्या शहर कार्यकारिणीतून देण्याचे राष्ट्रवादीने ठरविले असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने आज 'सरकारनामा'ला सांगितले. विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने केल्यानंतर अजित पवार पक्षाचा मेळावा उद्या दुपारी घेणार आहेत. त्यात ते त्यात आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे समजते.

माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांची आधीची कार्यकारिणी पाचशेची होती. मात्र, वाघेरेंच्या अध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने आणि गेलेली महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळविण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने शहरातील भाकरी फिरवली. नवीन शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष आणि युवक शहराध्यक्ष १२ फेब्रुवारीला दिले.आता त्यांची नवी कार्यकारिणी उद्या जाहीर केली जाणार आहे. ती सर्वसमावेशक व्हावी म्हणून त्यात अजितदादांनी दोनदा बदल केल्याचे समजते. ही कार्यकारिणी आधीपेक्षा मोठी म्हणजे सहाशेची असणार आहे.

Ajit Pawar NCP
दर दहा दिवसांनी काँग्रेसचे आमदार फोडणार! हार्दिक पटेलांची रणनीती

पूर्वीच्या कार्यकारिणीत बहुतांश सेलचे अध्यक्ष मराठा होते. त्यामुळे यावेळची कार्यकारिणी सर्वसमावेशक करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी काही सेल अध्यक्षांचे राजीनामे घेऊन तेथे अल्पसंख्याक आणि ओबीसी चेहरे आधीच देण्यात आले आहेत. तर, उद्या नवी कार्यकारिणी जाहीर करताना आणखी काही सेलचे अध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता आहे. तेथे ओबीसी चेहरे दिले जाणार आहेत.

Ajit Pawar NCP
अल्पसंख्याक शब्दाला आता भाजपचा आक्षेप; केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह म्हणाले...

महापालिका जिंकण्यासाठी शहरातील सर्व ४६ प्रभागांना व त्यातील तिन्ही वॉर्डांनासुद्धा अध्यक्ष दिले जाणार आहेत. याशिवाय शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १५ अध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस केले जाणार आहेत. पुरुष, महिला अशा दोन्ही पातळ्यांवर हे पदाधिकारी नेमले जाणार आहेत. पालिका निवडणूक कधीही झाली तरी, पक्षाचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय आहे, असे राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते फजल शेख यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in