पुणे जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर व मृत्यूदर तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.
ajit pawar corona meeting pune
ajit pawar corona meeting pune

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देत ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

‘कोविड-१९’ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाल्या.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, राहूल कुल, अतुल बेनके, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर व मृत्यूदर तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश होण्यासाठी कार्यवाही करावी. हवेली, खेड, मावळ, शिरुर, पुरंदर अशा रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे सांगून ‘जम्बो’ रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले की शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. प्रत्येक तालुक्यात कोविड केअर केंद्रात खाटांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांसाठी पुण्यातील रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत.
 

यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रशासन उत्तमरित्या काम करत असल्याचे सांगून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. आमदार  दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, राहूल कूल, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. उद्योग व्यवसाय सुरु ठेवतांना उद्योजकांनी कामगारांच्या आरोग्याची  काळजी घ्यावी, सीएसआर निधीतून मदत उपलब्ध करुन द्यावी. अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी. अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या भागांत कोविड रुग्णालय सुरु करावे, तपासणी संख्या वाढवावी, अँटीजेन तपासणी करण्यात यावी. प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढविण्यात यावा, अशा सूचना यावेळी केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली. तसेच प्लाझ्मा उपचार पध्दतीचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील रुग्ण दर व मृत्यू दर, प्रतिबंधित क्षेत्रे, अधिक रुग्णदर असणाऱ्या भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  कोविड रुग्णालये, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा व अन्य आवश्यक आरोग्य सेवा सुविधा व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com