चांदेरेंना उपाध्यक्ष करत अजितदादांनी मुळशीला दिले सरप्राईज!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
चांदेरेंना उपाध्यक्ष करत अजितदादांनी मुळशीला दिले सरप्राईज!
Sunil Chandere Sarkarnama

पौड (जि. पुणे) : मनी आणि मसल पॉवरला न जुमानता विजयश्री खेचून आणणारे सुनील चांदेरे यांना पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे (pdcc bank) उपाध्यक्ष करून उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसला सरप्राईज दिले आहे. जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदाच्या रूपाने सुनील चांदेरे यांना पक्षनिष्ठेचेच फळ मिळाले आहे. तथापि चौदा वर्षांनंतर मुळशीला जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदाचा मान मिळाल्याने तालुक्यातील सहकाराच्या वाढीला खतपाणी मिळणार आहे. (Ajit Pawar made Sunil Chandere Vice President of pdcc bank and gave a surprise to Mulshi)

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एका बाजूला आत्माराम कलाटे यांची अखंड बावीस वर्षांची संचालकपदाची कारकीर्द, तर दुसऱ्या बाजूला सुनील चांदेरे हा राष्ट्रवादीचा नवा चेहरा होता. मतदार अवघे 45 होते, त्यामुळे अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुळशीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यात अजित पवार यांनी मुळशीची निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचे वक्तव्य प्रसार माध्यमांसमोर केले होते. तर भूगावला राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुळे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याचे सूचक विधान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी पक्षाच्या तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एकमुठ बांधली. प्रत्येक मत मिळविण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी रात्रंदिवस धावत होते. पक्षातील काही ज्येष्ठ मात्र पडद्याआडून कलाटे यांच्यासाठी सूत्रे हालवित होते. त्यामुळे सावध, संयमी भूमिका घेत महादेव कोंढरे, सभापती पांडुरंग ओझरकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी धडपड केली.

Sunil Chandere
अजित पवारांनी फोन केला की स्क्रिनवर `private number`, असे दिसते..

या दरम्यान मनी आणि मसल या दोन्ही शक्तींचाही या निवडणुकीत पुरेपूर वापर झाला. सोसायट्यांचे प्रतिनिधी बदलण्याचे नाट्य रंगले. तीन सोसायट्यांचे प्रतिनिधी अंतिमक्षणी बदलले गेलेही. त्यामुळे शेवटपर्यंत या निवडणुकीने मुळशीकरांची उत्कंठा वाढविली होती. तथापि 11 मतांची आघाडी घेत सुनील चांदेरे यांनी विजयश्री खेचून आणली. याचा अजित पवार, सुप्रिया सुळे यांनाही आनंद झाला. चांदेरेच्या एकनिष्ठेचे फळ आणि कार्यकर्त्यांना कामाची पोचपावती म्हणून जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदी चांदेरे यांची वर्णी लागली. मुळशीचे आत्माराम कलाटे हे 2008 मध्ये बॅंकेचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी एक वर्ष उपाध्यक्षही होते. चौदा वर्षांनंतर पुन्हा एकदा तालुक्याला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली.

Sunil Chandere
नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडेंच्या पॅनेलची सरशी

तडफदार वक्तृत्वशैली

वयाच्या 27 व्या वर्षापासून सुनील चांदेरे हे राष्ट्रवादीत काम आहेत. एम.कॉम झालेल्या या युवकाचा सूस (ता. मुळशी) गावचे उपसरपंच ते बॅंकेचे उपाध्यक्ष हा प्रवास केवळ राष्ट्रवादीच्या घड्याळाचाच गजर करणारा ठरला आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच संघटनेत काम करण्याचे धडे त्यांना मिळाले. त्यांनी युवा अस्मिता संघटनेची स्थापना करीत युवकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या तडफदार वक्तृत्वशैलीने त्यांनी अनेक सभा गाजवल्या. शरद पवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. (कै.) तुकाराम हगवणे यांच्या तालमीत त्यांच्यावर राजकीय संस्कार झाले. त्यामुळेच 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर त्यांनी पक्षात सक्रियपणे काम करण्यास सुरूवात केली. आपल्या सूसगावापासून राष्ट्रवादीच्या बळकटीचा त्यांनी शुभारंभ केला. ग्रामपंचायतीवर 2002 मध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणली. 2002 ते 2007 या काळात ते गावचे उपसरपंच होते.

Sunil Chandere
एमपीएससीच्या विद्यार्थ्याची पुण्यात पुन्हा आत्महत्या

मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

सुनील चांदेरे यांना पक्षश्रेष्ठींनी 2015 मध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केले. अध्यक्षपदाची त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनिय ठरली. या काळात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत त्यांनी सर्व गण आणि गटात जावून प्रचारात केलेली भाषणे, पक्षातील बंडखोर गद्दारांसह, विरोधकांवरही केलेली सडेतोड टीका त्यावेळी उमेदवारांना विजयी होण्यासाठी बळ देऊन गेली. त्यामुळे मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली होती.

त्यांनी बाबूराव रायरीकर प्रतिष्ठानची स्थापना करून रायरीकरांचे उपेक्षित कार्य जनतेसमोर आणले. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारीणीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. घरात सुमारे दीड हजार पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय असलेल्या चांदेरे यांना वाचनाचा मोठा व्यासंग आहे. वाचनातून त्यांना लेखनाचीही आवड निर्माण झाली. राजकारणात आतापर्यंत निष्कलंकपणे काम केलेले चांदेरे यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूकही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत जिंकली. त्यामुळेच निवडून आल्याक्षणी उपाध्यक्षपदी काम करण्यासाठी त्यांची वर्णी लागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in