कार्यक्रमाला पावणेसातला येणार म्हटल्यावर तो म्हणाला, सकाळच्या की संध्याकाळच्या?

मी मुद्दाम कुणाला टोचून बोलणारा माणूस नाही; पण खरे तेच सांगणे हा माझा स्वभाव आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

शिरूर : शिरूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी सात वाजता होते. अजितदादा प्रत्यक्षात साडेसहालाच शिरूरमध्ये आले. लवकर येण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, कोरोनाचे सावट जसे जगावर आहे; तसेच ते अद्याप आपल्या परिसरावरही आहे. म्हणून कार्यक्रमास गर्दी जमवू नये, असे आवाहन केले होते. परंतु कितीही सांगितले तरी गर्दी होते, ती टाळण्यासाठी सकाळी लवकर कार्यक्रमाला आलो, असे सांगून अजित पवार म्हणाले की, मी पावणेसातला कार्यक्रमाला येणार आहे, असे एकाला फोनवर सांगितले तर तो म्हणतो सकाळच्या का संध्याकाळच्या. तेव्हा त्याला निक्षून सांगावे लागले की, सकाळी... यावर सभास्थानी एकच हशा पिकला. (Ajit Pawar inaugurates new administrative building of Shirur Municipal Council)

खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले की, नियमांचे पालन करताना राज्यकर्ते म्हणून आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये, याची खबरदारी आम्ही घेत असताना नागरिकांनीही जबाबदारी ओळखावी, काळजी घ्यावी. अंतर राखावे, हात धुवावेत, मास्क वापरावा. स्वतःची काळजी घेताना, कुटुंबाचीही काळजी घ्यावी. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची खबरदारी माझ्या-तुमच्यासह सर्वांनी घेतली पाहिजे.

Ajit Pawar
‘वर्षा’बाहेर अर्धा तास बसलेल्या भावना गवळी रिकाम्या हातांनी परतल्या

नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे अजितदादांनी तोंडभरून कौतुक केले. १४ कोटी रूपये खर्चाच्या या तीन मजली इमारतीची, तीमधील सुविधांची, नियोजनाची सुमारे तासभर त्यांनी बारकाईने पाहणी केली. इमारतीतील सुविधांची माहिती जाणून घेतली. वेगाने विकसीत होत असलेल्या शिरूर शहराच्या वैभवात भर घालणारी ही देखणी वास्तू आहे. या इमारतीतून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्याचा आणि शहर विकासाला चालना देणारा असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कुठलेही काम करताना दूरदृष्टी असावी लागते. ती दूरदृष्टी प्रकाश धारिवाल, वैशाली वाखारे, विजय दुगड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवली असून, पढील पन्नास-शंभर वर्षांचा विचार करून या इमारतीची उभारणी केली आहे. सरकारने दिलेल्या निधीचा अत्यंत चांगला आणि पुरेपूर विनीयोग करून ही वास्तू साकारली आहे. इमारत जितकी चांगली तितकीच किंवा कांकणभर सरस सेवा नागरीकांना या इमारतीतून मिळाली पाहिजे. लोकाभिमुख कारभाराचा नवा 'शिरूर पॅटर्न' या इमारतीतून सुरू व्हावा, असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला.

मी मुद्दाम कुणाला टोचून बोलणारा माणूस नाही; पण खरे तेच सांगणे हा माझा स्वभाव आहे, असे स्पष्ट करून अजितदादांनी तीस कोटी खर्चून उभारलेल्या वडूज पोलिस ठाण्याच्या इमारतीची आणि १४ कोटी खर्चून उभारलेल्या शिरूर नगर परिषदेच्या कामाची तुलना केली. वडूज पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या कामाला पाच हजार रूपये प्रति स्क्वेअर फूट खर्च आला. परंतु तिथल्या बांधकामात अनेक दोष होते. त्या चुका मी काढत असताना बाकीचे पुढारी कौतुक करीत होते, तेव्हा त्यांना कौतुक करण्यासारखी ही बाब आहे का, असे म्हणत फटकारले. काम चांगले व्हायचे असेल, तर थोडी कडक भूमिका ठेवावीच लागते. सरकारच्या निधीचा वापर होत असताना दर्जेदार काम मिळत नसेल तर बोललेच पाहिजे. आज शिरूरचे काम पाहून मात्र समाधान झाले व आनंद वाटला. इथे चुका काढायला जागा शिल्लक नाही. शिवाय भविष्यातील प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून इमारत उभारली आहे. तीन हजार चारशे रूपये प्रतिस्क्वेअर प्रमाणे पैसे खर्चून खूप चांगली इमारत उभी राहिली आहे. शिवाय फर्निचर, विजेची व्यवस्था, एअर कंडीशनही त्याच पैशांत झाले. याचा इतर शासकीय कामे करतानाही आदर्श घेतला जावा. अशी कामे करताना स्वतःच्या घराचे काम करतो आहोत, अशी मानसिकता ठेवली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
देगलूरसाठी रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला काॅंग्रेसकडून उमेदवारी निश्चित

नगर परिषदांनी विकासाची कामे करताना, गोरगरीब जनतेसाठी 'इकॉनॉमी लीगल सेक्शन' अंतर्गत शासनाचा जो घरकुलाचा कार्यक्रम आहे तो प्राधान्याने राबवावा, त्यामध्ये राज्य सरकार नगर परिषदांना सर्वतोपरी सहकार्य करील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. शिरूर शहर व परिसरातील विकासकामांसाठी लवकरच २५ कोटी रूपयांचा निधी देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

शिरूर ते वाघोली दरम्यानच्या फ्लायओव्हर मुळे भविष्यात शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलेल व शिरूर शहर हे मराठवड्याकडून येणारांसाठी मुंबईसाठीचे प्रवेशदवार असेल. फ्लाय ओव्हरच्या कामाचा पाठपुरावा चालू असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. शिरूर शहरातील विविध विकास कामांसाठी दोन वर्षांत शंभर कोटीहून अधिकचा निधी आणला असून, भविष्यातील कामांसाठीही भरीव निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा चालू आहे व अजितदादांमुळे हा निधी मिळण्यात मोठे सहकार्य होत असल्याचे आमदार ॲड. पवार यांनी आवर्जून नमूद केले.

पुढील कार्यक्रमासाठी अजितदादा मुख्यमंत्री म्हणून या

नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी प्रास्तविकात, नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अजितदादांचे ऋण व्यक्त केले. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा खूप कार्यक्रमांना आले. आता भविष्यातील नगर परिषदेच्या पुढील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री म्हणून यावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. नगरसेवक विजय दुगड यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक संतोष भंडारी यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in