
Ajit Pawar : पिंपरी : राज्यातील सत्ताबदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज प्रथमच पिंपरी-चिंचवडचा (Pimpri-Chinchwad) दौरा केला. यावेळी त्यांनी 'निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा' या पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संवाद सभेत मार्गदर्शन करताना आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. याप्रसंगी त्यांनी एका महिन्यात राज्यात एकाचेच मंत्रीमंडळ आहे, अशी जोरदार टीका राज्यात अद्यापही मंत्रीमंडळ स्थापन झाले नसल्यावर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे, तर बिनखात्याचेच मंत्री आहेत, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
राज्यात नव्याने आलेल्या भाजप व शिवसेनेतील बंडखोरांच्या सरकारवर अजितदादांनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात तोफ डागली. त्यांच्या पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयावर हल्लाबोल करताना मग महापौर, मुख्यमंत्रीच नव्हे, तर देशाचा पंतप्रधानही जनतेतूनच होऊ द्या, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. पालिकांचे अधिकार आयुक्तांना, जिल्हा परिषदेचे अधिकार सीईओ, तर तालुका पंचायतीचे बीडीओला दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही आपले अधिकार हे मुख्य सचिवांकडे देऊन घरी निवांत बसावे, अशी फटकेबाजी त्यांनी केली.
राज्य प्रशासन ठप्प झाले असून त्यातून मार्ग निघेल, असेही दिसत नाही. हे योग्य नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी चपराक त्यांनी लगावली. फोटो आणि व्हिडीओ काढून वा न्यूज चॅनेलचे कॅमेरे पाहून मी कधीच पाहणी करीत नाही आणि करणारही नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या अशा कृत्यांवर लगावला.
मावळात २ तारखेला सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे पवार म्हणाले. मात्र, राज्य सरकारमधील कुणी त्यात लक्ष घालायला तयार नाही. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करीत ते मंत्रीमंडळातच सध्या कसे व्यस्त आहेत हे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. या गुन्ह्यातील नराधमाला फाशीच झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
घर, घर राष्ट्रवादी हा मंत्र त्यांनी यावेळी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. बारामतीअगोदर पिंपरी-चिंचवडने आपल्याला लोकप्रतिनिधी (खासदार) केले. म्हणून बारामतीएवढेच प्रेम या शहरावरही करतो असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या पाच वर्षात निरंकुश काम झाले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांचे फूटपाथ केले, पैसे खर्च करण्याचा सपाटा लावला, फक्त डल्ला मारण्याचे काम केले, या शब्दांत त्यांनी नाव न घेता महापालिकेतील माजी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले.
प्रभाग तीनचा होऊ द्या वा चारचा पिंपरी पालिकेत आपलीच सत्ता येणार, असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या भाषणात केला. त्यासाठी वज्रमुठ बांधली आहे, असे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात भाजपने शहर अधोगतीस नेले, प्रत्येक कामात त्यांनी भ्रष्टाचार केला, अशी तोफ त्यांनी डागली. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आदींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.