अमोल कोल्हे यांना ना शेतीतलं कळतं, ना सहकारातलं : खासदार आढळराव 

अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना ना शेतीतलं कळतं, ना सहकारातलं. त्यांना साध्या एखाद्या गावातलं राजकारणही कळत नाही.
Adhalrao-Patil
Adhalrao-Patil

राष्ट्रवादीने अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना या वेळी शिवसेनेतून आणून थेट शिरूर लोकसभा मतदारसंघात उतरविल्याने खासदारकीची हॅट्ट्रिक केलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे या वेळी विजयाचा चौकार कसे मारतात, याबाबत उत्सुकता आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खासदार आढळराव यांच्याशी केलेली खास बातचीत.

प्रश्न : या वेळी महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्यापुढे आव्हान उभे केलेय का?
खासदार आढळराव : राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ते उपस्थित करीत असलेले प्रचार मुद्दे या वेळी राष्ट्रवादीलाच अडचणीचे ठरलेत. उदा. बैलगाडा शर्यती त्यांनीच बंद केल्या, त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी त्यात आडकाठी आणली आणि त्यांच्याच आंबेगावच्या नेत्याने प्राणी मित्र संघटनेला या वादात ओढले. हे मी बोलू लागल्यावर कोल्हे गप्प झाले. विमानतळाचेही तसेच. सहा आमदार, केंद्र- राज्यात सत्ता त्यांचीच. तरीही विमानतळ परत का गेले? वाहतूक कोंडीबाबत तर मी पुणे- नाशिक रस्त्यासाठी आणलेल्या निधीचे आणि 80 टक्के काम झाल्याचे पुरावे दिले. त्यांच्या घराचे राजकारण आणि त्यांची पाच कोटींची संपत्ती याबाबत त्यांची लबाडीही उघड झाली आहे.

-मागील तीन वेळीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अमोल कोल्हे यांच्यातील फरक काय सांगाल?
आढळराव :माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार विलास लांडे, माजी सभापती देवदत्त निकम हे तिन्ही नेते सामान्य माणसांमधील आणि शेती, साखर कारखानदारी, जिल्हा- राज्यातील राजकारणाची समज असणारे होते. मात्र या वेळी लांडे, निकमांसारख्यांना अपमानीत करून उमेदवारी दिलेल्या कोल्हे यांना ना शेतीतलं कळतं, ना सहकारातलं. त्यांना साध्या एखाद्या गावातलं राजकारणही कळत नाही. त्यामुळे पूर्वीचे तिघे आणि कोल्हे यांची तुलना म्हणजे त्या तिघांचे अवमूल्यन ठरेल.

-आपण पंधरा वर्षे काय केले, या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय द्याल?
आढळराव : पूर्वीच्या दहा वर्षांत कॉंग्रेस- राष्ट्रवादीने निधीबाबत अन्याय केलेल्या मतदारसंघात सन 2014 नंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 14 हजार कोटींची कामे मार्गी लावली. अष्टविनायक महामार्ग, पुणे- नाशिक रस्ता, तळेगाव- चाकण- चौफुला- न्हावरे रस्ता, पुणे- नगर रस्ता, जुन्नर- भीमाशंकर- राजगुरुनगर अशा पाच महामार्गांसाठी जवळपास सात हजार कोटी रुपयांच्या मंजुरीची कामे त्यांना दिसत नाहीत. ज्यांच्या उमेदवाराला मी 5 वर्षांत केलेल्या कामाच्या अहवालाची स्क्रिप्ट वाचून दाखवावी लागते, त्यांच्या आरोपांबद्दल काय बोलावे?

-साडेचार वर्षे भांडणे करून आता भाजपशी जुळवून घेताना काय अडचणी आल्या?
आढळराव : आम्ही भांडलो, पण तितक्‍याच प्रेमाने देशहितासाठी एकत्र आलोय. हे एकत्र येणे निवडणुकीच्या निकालातून आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मी घेतलेल्या आघाडीतून समजून जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे, बाबूराव पाचर्णे, योगेश टिळेकर, निरंजन डावखरे आणि आमच्या पक्षाचे आमदार शरद सोनवणे, सुरेश गोरे यांचे युती म्हणून सहकार्य कमालीचे आहे. या वेळी मी चार लाखांचे मताधिक्‍य घेईन नक्की.

-मोदींच्या पंतप्रधानपदाचा येथील निवडणुकीवर काय परिणाम होतोय?
आढळराव : राष्ट्रवादीचे उमेदवार कोल्हे हे प्रचारात घोड्यावरून, त्यांच्या मालिकेतील प्रतिमेतून खाली उतरलेच नाहीत. माझ्या विरोधात कुठलाच ठोस मुद्दा नसलेली निवडणूक मी पहिल्यांदाच अनुभवतोय. पंतप्रधान मोदींना देशाने पसंती दिलीय. अशा वेळी राज्यात दुबळ्या झालेल्या राष्ट्रवादीला केंद्रातील खासदारकी कशासाठी पाहिजे, याचे उत्तर त्यांच्यातील कुणाकडे नाही. मोदींवर देशाने टाकलेला विश्वास या निवडणुकीसाठी आणि माझ्यासाठीही प्रचंड प्रभावी ठरतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com