कार्यकर्त्यांचा खराखुरा ‘दादा’ - Activists' real Dada | Politics Marathi News - Sarkarnama

कार्यकर्त्यांचा खराखुरा ‘दादा’

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार यांच्या  सांगितलेल्या काही आठवणी...

पुणे : सतत कार्यमग्न राहणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांना कार्यकर्त्यांची तितकीच काळजी असते. घराची घडी बिघडू न देता राजकारण करा, असा त्यांचा नेहमी सल्ला असतो.कणखर नेता ही त्यांची खरी ओळख. मात्र, त्यामागे एक हळवे मन आहे. प्रत्येकाची काळजी घेणारा आणि चुकले तर कान धरणारा खराखुरा दादा ही अजित पवार यांची ओळख आहे.(Activists' real Dada) 

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ मध्ये मुंबईत स्थापना झाली. त्या वेळी राज्यभरातील अनेक नेते, लोकप्रतिनिधी या नव्या पक्षात सहभागी झाले. त्याचवेळी अनेक नव्या कार्यकर्त्यांना, तरुणांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचे आकर्षण होते. त्यामुळे, अनेक कार्यकर्ते या पक्षाकडे आकर्षित झाले. या सर्व कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम पवार कुटुंबाने केले, हे आवर्जून सांगावे लागेल. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना किंवा कोणता मोठा आर्थिक आधार नसतानाही, राजकारणात घडवण्याचे श्रेय या कुटुंबालाच आहे. असे अनेक कार्यकर्ते साहेबांनी घडविले. त्यामुळेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे राज्यभर पसरलेले दिसते. पवार साहेबांच्या बरोबरीने कार्यकर्त्यांना जपणे आणि उभे करण्याचे काम आदरणीय अजितदादांनी केले आणि त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही जोडत गेले. कार्यकर्त्यांना जोडण्याची जी अजितदादांची शैली आहे, त्याचा प्रामुख्याने उल्लेख करणे गरजेचे आहे. 

पक्षासाठी अनेक कार्यकर्ते आपला वेळ देत असतात, आयुष्य देत असतात. वेळप्रसंगी त्यांच्या पाठिशी उभे राहणे, ही गोष्टही पक्षासाठी महत्त्वाची असते. यामध्ये त्या व्यक्तीला आधार मिळतोच, त्याचबरोबर अन्य कार्यकर्त्यांनाही हुरूप येत असतो. अजितदादांच्या बाबतीत असे अनेक किस्से आपल्याला सांगता येतील. यामध्ये पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये घडलेला किस्सा मला आवर्जून आठवतो. पुण्याच्या उपनगरामध्ये काम करणाऱ्या एक माजी नगरसेविका अजितदादांना भेटायला आल्या. त्या उपनगरामध्ये एक शिक्षणसंस्था चालवत होत्या. परिसरातील गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय या संस्थेत होत होती. संस्थेला आता जागा कमी पडत होती आणि वाढत्या खोल्यांसाठी मदत मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी विनंती केली, त्यामध्ये दोन-तीन पत्र्याच्या खोल्या वाढवण्याचा त्यांचा विचार होता, असे स्पष्ट दिसत होते. त्यासाठी आर्थिक मदत कशी उभी राहील, असा त्यांचा रोख होता. पण, त्याच बैठकीत अजितदादांनी एका कौटुंबिक मित्राला फोन लावला आणि त्याला शाळेची स्थिती, परिसरातील समाजाची सोय या सर्व गोष्टी सांगितल्या. तसेच, आपल्याला काही व्यवस्था करायची आहे असेही सांगितले. दादांनी दखल घेतली, याचाच आनंद सर्वांना होता. पण, त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या खोल्या उभ्या राहिल्या आणि या शाळेच्या खोल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला होता. ही गोष्ट त्या नगरसेविकांनी सांगितली, त्यावेळी दादा आपल्या कार्यकर्त्याचा कसा विचार करतात, ही गोष्ट लक्षात येते. 

बरोबरचा कार्यकर्ता पूर्ण वेळ आपल्याबरोबर आहे, तरी त्याची काही कामे अडली नाहीत ना.. त्याच्या कुटुंबामध्ये सर्व ठीक आहे ना, याची माहितीही दादांना असते. त्यामुळेच, ते प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने सल्ला देत असतात, ‘बाबांनो, पहिल्यांदा घर सांभाळा, मग राजकारण करा. आर्थिक ओढाताण होत असेल, तर थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवा. पण घराची घडी बिघडू देऊ नका.’

अजितदादा म्हणजे कणखर नेता, अशी ओळख अनेक वेळा केली जाते. पण, या कणखर चेहऱ्यामागे हळवे मन आहे, याचा अनुभव अनेक वेळा आला आहे. मी महापौर असताना, एक दिवस अजितदादांबरोबर होतो. शहराच्या विविध भागांमध्ये विकासकामांची उद्घाटने होती. त्या वेळी मी अजितदादांच्याच गाडीमध्ये होतो. त्यांना बारामतीहून एक फोन आला. अनेक वर्षे दादांबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा तो फोन होता. तो कार्यकर्ता सांगत होता, ‘दादा, मी अनेक वर्षांपासून तुमच्याबरोबर आहे. मी तुम्हाला काही मागितले नाही आणि मागणारही नाही. फक्त आज माझ्या मुलाचे लग्न आहे आणि तुम्ही लग्नाला यावे, हीच माझी विनंती आहे.’ पुढे नियोजित कार्यक्रम होते, चार-पाच ठिकाणी उद्घाटने होणार होती. पण, अजितदादा म्हणाले, ‘प्रशांत, पुढची उद्घाटने तुम्ही उरकून घ्या. मला बारामतीला जायचे आहे. या व्यक्तीने माझ्या राजकारणात, आयुष्यात खूप काही केले आहे. त्याच्या मुलाच्या लग्नाला मला जावेच लागेल.’ त्यानंतर दादा लगेच बारामतीला गेले. त्यामुळे, त्या कार्यकर्त्याला किती आनंद झाला असेल, ही गोष्ट मीही समजू शकतो. 

कार्यकर्ते जपणे, माणसं उभी करणे ही एक प्रकारे दादांच्या कामाची पद्धतच आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही खूप मोठी संस्था आहे. पण, अपुऱ्या वेतनावर काम करणारे कर्मचारी, मोडकळीस आलेल्या इमारती, व्यावसायिक अभ्यासक्रमांचा अभाव, सुविधा नाहीत, अशा अनेक तक्रारी होत्या. पण, अजितदादांनी काही वर्षांपूर्वी या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आणि त्यानंतर या संस्थेची स्थिती काय आहे, हे सर्वांनी आवर्जून जाऊन पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेची व्यवस्थित इमारत, अत्याधुनिक प्रयोगशाळा, व्यावसायिक अभ्यासक्रम, पुरेसे वेतन असणारे कर्मचारी यांमुळे शिक्षक-कर्मचाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वत्र समाधान दिसून येते. या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचलेले पाहताना, त्याचा पाया या मूलभूत कामांमध्ये दिसून येतो. 

सकाळी साडेसहापासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करताना दादांना समोर आलेल्या व्यक्तीच्या कामांची जाणीव असते. त्यामुळेच, त्यांचे कार्यालय, बारामती हॉस्टेल किंवा त्यांच्या निवासस्थानी कायम माणसांचा राबता असतो. कधीकधी एखादी गोष्ट स्पष्टपणे बोलून गेलेले दादा, प्रत्यक्षात त्या गोष्टीचा पूर्ण विचार करून मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न करत असतात, याचा अनुभवही अनेकांना आला आहे. त्यामुळे, प्रत्येक कार्यकर्त्यालाच अजितदादा हा आधार वाटतो. अशा या कार्यकर्त्यांची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या नेत्याला वाढदिवसानिमित्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनापासून शुभेच्छा...!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख