
Pune News: आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. तर आम आदमी पार्टीनेही आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केलं असल्याचं दिसून येत आहे.
आम आदमी पार्टीची भूमिका गावोगावी आणि जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी 'स्वराज्य यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेची सुरवात येत्या रविवारी (ता.२८) पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन होणार आहे. या 'स्वराज्य यात्रे'ची सांगता रायगड येथे राज्याभिषेक दिनी (ता.६) होणार आहे.
ही यात्रा सात जिल्ह्यात जाणार आहे. तसेच या सात जिल्ह्यातील शहरे आणि गावांमध्ये सभा होणार आहेत. जवळपास ७८२ किलोमीटरचा प्रवास या यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत 'आप'चे मुकुंद किर्दत यांनी दिली आहे. याबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व युवा नेते गोपाल इटालिया यांनीही याबाबत भाष्य केलं.
इटालिया म्हणाले, "देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप पक्ष महाराष्ट्रात हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही. त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करत आहे ", असा आरोप करत ते पुढे म्हणाले, "भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील स्वराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्नशील आहे ", असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, "या यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. 'आप'तर्फे जास्तीत जास्त नागरिकांना या यात्रेत सहभागी करण्यात येणार आहे.
सध्या देशातील वाढत्या महागाईबाबत शेतकरी, नोकरदारांचे प्रश्न सरकार गंभीरतेने घेत नाही. तर यासाठी विरोधी पक्षही आवाज उठवण्यास तयार नाही, अशा वेळेस सामान्य जनतेचा आवाज बनून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू पाहत आहे", असं किर्दत यांनी सांगितलं.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.