
पुणे : वाढत्या इंधन दरवाढीने हैराण झालेल्या पुणेकरांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्यातील सर्व पेट्रोल पंपांवर आज सायंकाळी आंदोलन करण्यात येणार आहे. पंजाब मधील निवडणुकांच्या यशानंतर अन्य राज्यात पक्षाने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. पुणे महापालिकेची निवडणूक केव्हाही होऊ शकते. त्यादृष्टीने पुण्यातही पक्षाने तयारी सुरू केली असून आजचे आंदोलन त्याचाच एक भाग आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीसह भाजपा आणि इतर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर राजकीय आरोप करण्यात दंग आहेत. सर्व सामान्य माणसाच्या अडचणी, वाढती महागाई याकडे या पक्षांना लक्ष द्यायला वेळ नाही. सर्व पक्ष धर्म आणि राजकारणात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर आपच्या पुणे शाखेच्यावतीने इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची झळ देशातील सर्व सामान्य माणसाला बसत आहे. रोजच्या जगण्यातील वस्तू अत्यंत महाग होत असताना त्यावर कोणतीच उपाययोजना राज्य वा केंद्र सरकारकडून करण्यात येत नाही.
चार महिन्यांनी पूर्वी केंद्र सरकारने डिझल आणि पेट्रोलवरचा कर कमी केला होता. त्यानंतर राज्य सरकारने आपल्या व्हॅटमध्ये सूट देणे अपेक्षित होते. भाजपा शासित अनेक राज्यांमध्ये केंद्राच्या निर्णयानंतर करात सूट देण्यात आली. मात्र, महाराष्ट्रात अशा प्रकारची कोणतीच सूट न देता पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यात येत आहे. दरम्यान, वाढत्या महागाईची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांना करांमध्ये सूट देण्याचे आवाहन केले आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्ष केवळ धार्मिक राजकारण करण्यात गुंतल्याचे दिसत आहे. या निमित्ताने एकमेकांवर आरोप आणि पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या पुणे शाखेच्यावतीने इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करून सर्व सामान्य पुणेकरांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘आप’ला येत्या महापालिका निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व स्तरातील तरुणांचा वाढता सहभाग आणि प्रतिसाद ‘आप’ला मिळताना दिसत आहे.
पंजाबमधील निकालानंतर समाजातील सर्व घटक आपकडे अनेक्षेने पाहू लागले आहेत. पक्षाची पुणे शहरात एक चांगली टीम तयार होताना दिसत आहे. पुण्यात ‘आप’चे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीत सर्व जागा ‘आप’च्या वतीने लढविण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने पक्षाची संपूर्ण तयारी सुरू असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. सामान्य माणूस हाच पक्षाचा पाया असल्याने सर्व सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याचा पक्षाचा अजेंडा आहे.
Edited By : Umesh Ghongade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.