Pune News : चंद्रकांतदादा, पुण्यातील 'विक्रम–वेताळ' थांबवा, 'आप'ची पालकमंत्र्यांना आर्त साद

Aam Aadmi Party letter to Chandrakant Patil : कोथरुडकर जनतेने तुम्हाला निवडून दिल्याचा फायदा काय ?
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Aam Aadmi Party Abhijeet More letter to Chandrakant Patil : कोथरुडचं वैभव आणि पुणे शहराचं फुफ्फुस समजलं जाणारी तीन किलोमीटरची आणि लाखो झाडे असलेली वेताळ टेकडी फोडून दोन किलोमीटरचा रस्ता (बालभारती ते पौड) करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे.

पर्यावरणप्रेमींनी त्याला कडा़डून विरोध केला असून पर्यावरणाची ही हानी रोखण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना खुले पत्रच लिहिले आहे.

Chandrakant Patil
Renuka Chowdhury On PM Modi: 'शूर्पणखा' मोदींच्या अडचणी वाढवणार ? मानहानीचा गुन्हा ?; काँग्रेस महिला नेत्याचे...

आम आदमी पार्टी तथा `आप`चे पुणे संयोजक आणि कोथरुडकर डॉ. अभिजीत मोरे यांनी कोथरुडच नाही,तर समस्त पुणेकरांच्या वतीने हे खुले पत्र पालकमंत्र्यांना लिहून वेताळ टेकडी वाचविण्यासाठी त्यांना आर्त साद घातली आहे.

`दादा, पुण्यातील विक्रम –वेताळ खेळ थांबवा` या मथळ्याखाली लिहिलेल्या या पत्राला काय आणि कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता पर्यावरणप्रेमीच नाही,तर पुण्याचेही लक्ष लागले आहे.

Chandrakant Patil
मोठी बातमी : ED, CBI च्या विरोधात १४ पक्षांची सुप्रीम कोर्टात धाव

विकासकामांना विरोध नाही,पण टेकड्या नष्ट केल्या,तर पुन्हा त्या कशा तयार करणार अशी नेमकी विचारणा याव्दारे करण्यात आली आहे.तसेच टेकडी फोडून रस्ता करण्याऐवजी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची सूचनाही यातून केली गेली आहे.वाढते प्रदूषण आणि हवेचा ढासळणारा दर्जा पाहता अशा टेकड्यांची सार्वजनिक आरोग्यासाठी नितांत गरज या पत्रातून प्रतिपादित करण्यात आली आहे.

'आप'चे डॉ. अभिजीत मोरे पत्रात म्हणतात..

माननीय चंद्रकांत दादा,

पुण्यात चाललेला 'विक्रम- वेताळ' हा खेळ बघितल्यावर कोथरुड, बावधन, पाषाण, बाणेर येथील सुज्ञ रहिवाशांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पुण्याचे पालकमंत्री व कोथरुड विधानसभेचे आमदार असणाऱ्या चंद्रकांतदादांचे खरेच कोथरुडवर प्रेम नाही का ? दादा, तुम्ही कोथरूडचं वैभव का नष्ट करत आहात ? खरं म्हणजे ऐनवेळी कोल्हापुरातून कोथरुडमध्ये येऊन स्थानिक उमेदवारांना बाजूला सारुन भाजपने तुमची उमेदवारी घोषित केली आणि त्याला कोथरुडमधील जनतेने प्रतिसाद देखील दिला. असे असून सुद्धा तुम्ही कोथरुडकरांवर का सूड उगवत आहात? कोथरुडकरांच्या प्रेमाची भरपाई तुम्ही अशी कराल याची अपेक्षा कोथरुडवासियांना नव्हती.

विक्रम कुमार हे प्रामाणिक प्रशासक ?

ज्याला कोथरुडचं वैभव आणि पुणे शहराचं फुफ्फुस समजलं जातं त्या शांत,निसर्गरम्य वेताळ टेकडीला गिळंकृत करण्यासाठी, नष्ट करण्याकरीता पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार हे सरसावलेले आहेत. ते स्वतःला 'विक्रम- वेताळ' या गोष्टीतील राजा विक्रम समजत आहेत आणि स्वतः सोबत वेताळ टेकडी फोडून घेऊन जायचा दररोज प्रयत्न करत आहेत. गोष्टीतील राजा विक्रम हा जरी एक प्रामाणिक राजा होता, तरी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे प्रामाणिक प्रशासक आहेत, असं म्हणता येणार नाही. वेताळ टेकडी फोडून त्या ठिकाणी रस्ते, बोगदा व तथाकथित इतर कामे करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेत, राज्यात व केंद्रात भाजपचे ट्रिपल इंजिनचे सरकार असताना कोथरुडचा श्वास असलेल्या व पुण्याचे फुफ्फुस असलेल्या वेताळ टेकडीचा घास घेतला जात असेल तर सर्वसामान्य कोथरुडकर जनतेने तुम्हाला निवडून दिल्याचा फायदा काय ?

किमान भस्मासुर तरी बनू नका..

दादा, विकास कामांना विरोध नाही. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते बनवायला पाहिजेत. ते जरुर बनवा... परंतु पुणे शहरातील ऑक्सिजन निर्मितीचे केंद्र असलेल्या या टेकड्याफोडून, निसर्ग नष्ट करून रस्ते बनवणे, बोगदे बनवणे हे सामान्य पुणेकरांना मान्य नाही. तुमचा पक्ष कितीही पॉवरफुल पक्ष असला तरी तुम्ही केवळ रस्ते बनवू शकाल... पण तुम्ही शहराच्या मधोमध पुन्हा टेकड्या आणि निसर्ग बनवू शकणार नाही. त्याला ब्रह्मदेवच लागेल ! ... आणि तुमचा पक्ष काही ब्रह्मदेव नाही. तेव्हा एक साधी विनंती आहे की, किमान भस्मासुर तरी बनू नका. जे बनवता येत नाही, ते नष्ट करु नका. टेकड्या फोडून बालभारती - पौड रोड करण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, सिग्नलचे योग्य सिनक्रोनायझेशन करणे यासारखे उपाय करायला पाहिजे अशी आग्रही विनंती आहे.

Chandrakant Patil
BJP Mission 2024 : काशीमधून मोदी आज निवडणुकीचं बिगुल वाजवणार ; भाजप मिशन २०२४..

विक्रम कुमारांनी या ४२ बोगस अभियंत्यांना अभय दिले..

गेली पाच वर्षे पुणे मनपात सत्ता असून देखील भाजपला पी.एम.पी.एम.एल. ही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारायला जमली नाही. टक्केवारी- टेंडरबाजी याकडे तुमच्या पक्षातील नेत्यांनी कमी लक्ष दिले असते तर ते कदाचित होऊ शकले असते. रस्ते व रस्त्यावरील खड्डे, पावसाळा आल्यावर रस्त्यावर साचणारे पाणी याबद्दल बोलायलाच नको एवढी वाईट स्थिती आहे. अहो दादा, पुणे मनपाच्या स्थापत्य विभागात ४२ बोगस इंजिनियर अधिकारी आहेत. गेले दीड वर्षे याबाबत आम आदमी पार्टी आवाज उठवत आहे. पण तुमच्या विक्रम कुमारांनी या ४२ बोगस अभियंत्यांना अभय दिले आहे. कोणतीही डिग्री नसताना भाजपची सत्ता असताना ४२ मुन्नाभाई इंजिनीयर हे मनपातील अधिकारी बनले आहेत. बालभारती- पौड रोडचे डिझाईन हेच बोगस इंजिनीयर तपासणार आहेत का ? पुण्यात कुठेही, कधीही, कसेही फ्लायओव्हर बांधले जातात आणि अचानक पाडलेही जातात. पुणेकर नागरिकांना अशा प्रकाराचा अक्षरशः वीट आलेला आहे.

बहरलेल्या टेकड्या वाचल्या पाहिजेत

दादा, दिवसेंदिवस पुणे शहरातील एयर क्वालिटी इंडेक्स हा बिघडत चाललेला आहे. पुणे शहरातील प्रदूषित हवेचे प्रमाण वाढत चाललेले आहे. पुणे शहराला गॅस चेंबर बनू द्यायचे नसेल तर शहराची ही फुफ्फुसे म्हणजे निसर्गाने बहरलेल्या टेकड्या वाचल्या पाहिजेत आणि या टेकड्या वाचवण्यासाठी केवळ एकच उपाय आहे- तो म्हणजे या टेकड्यांना अजिबात हात न लावणे. Hands Off... "तुम्हाला जो काही विकास करायचा आहे, तो टेकड्या सोडून करा" एवढे नम्र आवाहन आहे.

Chandrakant Patil
Pune News : विकास निधीवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये जुंपली; श्रेयवादावरुन पत्रकबाजी

अन्यथा हे वेताळ टेकडी नावाचं भूत

तुम्हाला अरब, उंट व तंबूची गोष्ट माहित असेलच. एकदा का या नवनवीन रस्त्यांचा उंट वेताळ टेकडी नावाच्या तंबूत शिरला की हळूहळू सगळा निसर्ग बाहेर फेकला जाईल अशी भिती अनेक सुज्ञ, जागरुक नागरिकांना वाटत आहे. ती अनाठायी आहे असे म्हणता येणार नाही.

"वेताळ टेकडी फोडणे हा विकास नाही, तर विनाश आहे" एवढं तुमच्या सरकारला व आयुक्त विक्रम कुमार यांना तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगावं अशी विनंती आहे. दादा, पुण्यात चाललेला विक्रम- वेताळ हा खेळ तात्काळ थांबवावा... अन्यथा हे वेताळ टेकडी नावाचं भूत भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर कधी बसेल हे कळणार देखील नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in