सर्वपक्षीय 'आखाडा'त कार्यकर्ते फोडताहेत नळ्या : सरकार गेले आणि आले तरी फरक नाही...

Pune Political Latest Marathi News : राज्यात तापलेल्या राजकीय आखाड्यातही पुण्यात (Pune) वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडत आहे
pune
punesarkarnama

पुणे : उत्तर आणि दक्षिण भारतातल्या अत्यंत कडवट राजकीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या आणि त्यातही पुण्यातल्या (Pune) खेळीमेळीच्या राजकारणाचे उदाहरण सांगितले जाते. राजकीय विरोधक म्हणजे शत्रु नव्हे, हे लक्षात घेऊनच पुण्यातली सर्वपक्षीय मंडळी सातत्याने एकत्र येत असतात. यंदा या परंपरेला चमचमीत, झणझणीत आणि मसालेदार तडका मिळाला. पुण्यातली राजकीय मंडळी चक्क सर्वपक्षीय आखाड सोहळा साजरा करत आहेत. आषाढ सुरु झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), कॉंग्रेस (Congress), भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), मनसे (Mns) या प्रमुख पक्षांसह अन्य पक्षीय नेते-कार्यकर्ते मटणाच्या नळ्या फोडण्यासाठी, रस्सा ओरपण्यासाठी दररोज एका पंगतीला बसतात. (Pune Political Latest Marathi News)

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपचे एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. राजकीय घडामोडींचा या सर्वपक्षीय आखाड सोहळ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या सोहळ्याला पुण्याचे खासदार, भाजप नेते गिरीश बापट हे देखील या पंगतीला उपस्थित असतात. मात्र, ते मांसाहार करत नाहीत. त्यांच्या पुरती शाकाहारीची सोय केली जाते.

व्रतवैकल्यांनी भरलेल्या श्रावण मासात अनेक हिंदू धर्मीय मांसाहार करत नाहीत. त्याची भरपाई म्हणून त्या आधीच्या आषाढ महिन्यात म्हणजेच आखाडात मनसोक्त मांसाहार केला जातो. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यंदाच्या आखाडात एकही खाडा होऊ नये यासाठी भन्नाट कल्पना लढवली आहे. त्यातून आषाढ मास उत्सव सुरु झाला. जुलैच्या एक तारखेला सुरु झालेला हा उत्सव येत्या २८ जुलैपर्यंत साजरा होणार आहे. केवळ होऊन गेलेली आषाढी एकादशी आणि येणारी गुरु पोर्णिमा या दोनच दिवशी या आषाढ मास सोहळ्याला सुट्टी देण्यात आली आहे.

pune
PMO च्या पसंतीस उतरलेले श्रीकर परदेशी आता फडणवीस यांच्या दिमतीला

बाकी सर्व दिवशी मनसोक्त मांसाहाराच्या पंगती उठवल्या जात आहेत. या उत्सवादरम्यान कार्यकर्त्यांना दिवस वाटून देण्यात आले आहेत. संबंधित नेता-कार्यकर्ता त्याच्या ठरलेल्या दिवशी कोंबडी, बोकड, मेंढा, मासे यांच्या मांसाचे जमतील तितके पदार्थ लोकांना पंगत बसवून खाऊ घालतो. भाकरी, चपाती, भात, बिर्याणी यांच्या संगतीने या पंगतीत रोज किलोवारी मांसाचा फन्ना उडतो. कोल्हापुरी, मालवणी, सावजी, लखनवी, हैद्राबादी अशा विविध चवींच्या अनेक 'नॉनव्हेज' पदार्थांची रेलचेल या पंगतीत असते. ज्या त्या कार्यकर्त्याचा उत्साह आणि खर्च करण्याची इच्छा यावर पंगतीतल्या पदार्थांची संख्या कमीजास्त होत राहते. अट एकच ती म्हणजे दररोज मांसाहार असला पाहिजे.

नारायण पेठेतल्या भरत मित्र मंडळाचे प्रमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांनी आखाड सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यांना भाजप, शिवसेना, मनसे, कॉंग्रेसच्या राजेश येनपुरे, दत्ता सागरे, बाळासाहेब बोडके, नितीन कोतवाल, संजय बालगुडे आदी अनेकांची साथ मिळाली. दररोज दुपारी एक नंतर नारायण पेठेत ही पंगत बसते. पन्नासपासून दीडशेपर्यंत कार्यकर्ते रोजच्या पंगतीत चमचमीत मांसाहार करतात. दर्दी मंडळींसाठी रात्रीच्या वेळी 'मंतरलेल्या रंगीत पाण्या'सह आखाड सोहळ्याची 'उंची' वाढवली जाते. या रात्रीच्या पंगतीला अगदी मोजक्या मंडळींनाच प्रवेश दिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

pune
एकनाथ शिंदेंनी भाजपला कोंडीत पकडले : ऊर्जा, बांधकाम खात्यांसाठीचा हट्ट सुटेना!

या अभिनव सर्वपक्षीय आखाडाची पुण्यात चविष्ट चर्चा आहे. या आखाड सोहळ्याचे प्रणेते अंकुश काकडे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले की, आखाडात मांसाहार करणे सर्वांनाच आवडते. मात्र, रोज कोणाला तरी पार्टी मागत बसण्यापेक्षा रितसर नियोजन करण्याचे ठरले. त्यातून या सर्वपक्षीय आखाड महोत्सवाची कल्पना पुढे आली आहे. राजकारणातला विरोध, मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळे एका पंगतीत बसून मांसाहाराचा आनंद लुटतो. यातून एकोप्याची, सामंजस्याची राजकीय संस्कृती टिकून राहते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in