कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल इच्छुक नसतील तर माझी तयारी : गजानंद होसाळे   - Pune youth desires to become President of AICC | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल इच्छुक नसतील तर माझी तयारी : गजानंद होसाळे  

उमेश घोंगडे 
सोमवार, 22 जुलै 2019

जग बदलण्याची हीच वेळ आहे. आपणच बदलले पाहीजे, म्हणूनच मी हे पाऊल उचलले आहे. - गजानंद होसाळे

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहेत. तेव्हापासून कॉंग्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला असून त्यांच्या जागी कोणाची निवड करावी, याबाबत देशपातळीवरील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता कॉंग्रेसला चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी पुण्यातील एक उच्चशिक्षित, तरुणतडफदार उमेदवार इच्छुक आहे.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसतील  तर माझी तयारी आहे , असा दावा पुणे येथील काँग्रेसचे कार्यकर्ते गजानंद होसाळे  यांनी केला आहे . 

गजाजन उद्या  मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करणार आहेत . 

लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनीच स्वतः पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी नवा उमेदवार शोधण्याचे आदेश दिले. अनेक दिवस उलटले तरीही गल्लीपासून दिल्लीपयर्यंतच्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा उमेदवार काही मिळाला नाही. गांधी यांची जागा कोणी घ्यायची, याच्यावरुन कॉंग्रेसमध्येच संभ्रम निर्माण झाला. 

त्यांच्यातील हा गोंधळ पाहूनच आणि देशात बदल घडविण्यासाठी पुण्यात भोसरी येथे राहणाऱ्या गजानंद होसाळे यांनीच कॉंग्रेसचा अध्यक्ष होण्याचे ठरविले आहे. आता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ते कसे शक्‍य आहे ? तर अशक्‍य कुठलीही गोष्ट नसते. राहुल गांधी यांना किंवा गांधी कुटुंबीयांना कायमच गरीब व गरीबी, मध्यमवर्गीयांविषयी आपुलकी आहे. त्यांना देशामध्ये बदल घडवायचा आहे, आणि हो त्यांना तरुणांना संधी द्यायची आहे. या सगळ्या पात्रतेमध्ये गजानंद होसाळे बसतात. विशेषतः ते केवळ 28 वर्षांचेच आहे, 

गजानंद हे कर्नाटकमधील बिदर येथे अभियांत्रिकीची पदविका घेतलेले तरुण आहेत. बंगळुरूस्थित एका कंपनीच्या पुण्यातील कार्यालयामध्ये ते काम करीत आहेत. गावाकडे पाच-सहा एकर कोरडवाहु शेती करणाऱ्या वडीलांना मदत करीत गजानंद व त्यांचे भाऊ पुण्यात स्थायिक झाले. सध्या त्यांचे कुटुंब भोसरी येथे वास्तव्य करीत आहे.  त्यामुळे घर कसे चालवायचे, शेती कशी करायची, बसमधून धक्केखात घरी कसे पोचायचे, नक्षलवादी, दहशतवाद्यांपासून विविध कट्टरपंथीय विचारधारेपासून वाचायचे कसे, यांसारख्या कित्येक प्रश्‍नांची त्यांना जन्मतः चांगली जाण आहे. 

ते प्रश्‍न सोडविण्यासाठी नेमकी काय उपाययोजना केली पाहीजे, याचीही त्यांना चांगलीच माहिती आहे. याबरोबरच जातीभेद, धर्मभेद, दारीद्रय, भ्रष्टाचार, लिंगभेद, विषमता, गरीबी, पर्यावरण, बेरोजगारी यांसारख्या प्रश्‍नांना ते आपल्या कृतीतुन उत्तर देणार आहेत. कार्ल मार्क्‍स, महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय साधून त्यांना देश कल्याणकारी बनवायचा आहे.

गजानंद होसाळे यांचा "विक पॉईंट' एवढाच आहे, की त्यांना 'राजकीय घराणेशाही' नाही. कॉंग्रेस काय किंवा इतर पक्ष काय सगळ्यांमध्येच घराणेशाही टिच्चून भरलेली आहे. त्यामुळे त्यांचा तिथे निभाव लागेल काय ? असा प्रश्‍न तुमच्याही मनात नक्कीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तरीही गजानंद होसाळे यांना कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचेच आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी (ता.23) गजानंद हे कॉंग्रेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे व संजय जगताप यांच्याकडे अर्ज सुपुर्द करणार आहेत. त्यावेळी ते त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत.

या संदर्भात बोलताना होसाळे म्हणाले, " सर्वसामान्य नागरीक किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बदल घडविण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु अनेक अडचणी व अडथळ्यांच्या शर्यतीमुळे आपल्याला यश येत नाही. परंतु जेव्हा आपल्या हातामध्ये मोठी ताकद असेल, तेव्हाच बदल घडविणे शक्‍य होऊ शकेल. जग बदलण्याची हीच वेळ आहे. आपणच बदलले पाहीजे, म्हणूनच मी हे पाऊल उचलले आहे.''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख