`पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....` - Jedhe had told Sharda Pawar : do not keep calling me for this work | Politics Marathi News - Sarkarnama

`पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

विजय जाधव
बुधवार, 16 डिसेंबर 2020

प्रसिद्धीपासून दूर राहून मला साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले त्यामध्ये संपतरावांचे स्थान अग्रभागी राहील- शरद पवार 

भोर : पवारसाहेब, तुम्ही मला या कामासाठी फोन करू नका, असे सांगणारे भोरमधील एकमेव व्यक्तिमत्व होते ते म्हणजे भोरचे माजी आमदार संपतराव जेधे. याची खुद्द आठवण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितली.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना निवडणुकीसाठी मदत करा म्हणून शरद पवार हे जेधे यांना फोन करायचे. त्यावर जेधे हे थोडे नाराज आवाजात म्हणायचे की पवार साहेब तुम्ही या कामासाठी फोन करत नका जाऊ. सुप्रिया जशी तुमची मुलगी आहे. तशी मलाही ती मुलीसारखी आहे. तिच्या निवडणुकीत काम करण्यासाठी तुमचा फोन येणे म्हणे आमच्यासाठी कमीपणा आहे, अशा शब्दांत जेधे हे पवारांना सांगायचे.

 

पवार यांचे जवळचे स्नेही म्हणून ओळख असलेल्या जेधे यांचे काल निधन झाले. त्यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी पवार आज तातडीने त्यांच्या आंबवडे येथील घरी गेले आणि जेधे यांना श्रद्धांजली वाहिली. जेधे यांच्या आठणवी यानिमित्त त्यांनी जागविल्या. 

या वेळी बोलताना पवार म्हणाले की १९७८ साली संपतराव माझ्यासोबतच आमदार झाले आणि त्यांनी सदैव मला साथ दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून मला साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले त्यामध्ये संपतरावांचे स्थान अग्रभागी राहील. सत्ता असो वा नसो त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली. त्यांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती.

``अशी नि: स्वार्थी, जिवाभावाची माणसे हा आपला ठेवा असतात, संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन,``अशा शब्दांत पवार यांनी दिलासा दिला.

जेधे यांचा परिचय

जेधे हे १९७८ साली अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. गांधी टोपी, अंगरखा व धोतर आणि धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले आमदार म्हणून त्यांची ओळख होती.  आंबवडे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दस सुरुवात केली. त्यानंतर भोर पंचायत समितीचे सभापतीपदानंतर ते आमदारपदी विराजमान झाले होते. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते उपाध्यक्षदेखील होते.

जेधे यांचे अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी भोर तालुक्याची अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राची ओळख राज्याला करून दिली.  ४० वर्षांपूर्वी त्यांनी रायरेश्वर दिंडीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरवरून ते रायरेश्वर दिंडीतून पायी पंढरपूरला जात होते. पंढरपूर येथील राज्य शासनाच्या पंढरपूर देवस्थान समितीचे ते १० वर्षे विश्वस्त होते. पंढरपूर व आळंदी येथील भक्तनिवास उभारणीसाठी त्यांचे योगदान होते. कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, शिरथरघळ (ता.महाड, जि.सातारा) येथील ट्रस्टचे अध्यक्ष होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख