`सोमेश्वर`च्या सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावणारे रामचंद्र भगत यांचे निधन

भगत हे गावातील सिद्धेश्वर सोसायटीतील कारभार सुधारायचा या हेतूने 1965 च्या दरम्यान ऐन विशी-पंचविशीत सहकारात उतरले. सोसायटी ताब्यात घेऊन सुधारणा केली.
ramchandra-bhagat-sharad-pawar
ramchandra-bhagat-sharad-pawar

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर करखान्यात 1992 पर्यंत काकडे गट तर त्यानंतर आजपर्यंत पवार गटाची सत्ता आहे. या दोन्ही सत्तेत तब्बल सलग 32 वर्ष संचालक राहण्याचा मान रामचंद्र ज्ञानदेव भगत यांनी पटकावला. इतके वर्ष संचालक असणारे कारखान्याच्या इतिहासातील ते एकमेव व्यक्ती होते. शिवाय त्यांनी सलग दहा वर्षे कारखान्याचे उपाध्यक्षपदही भूषविले होते. कारखान्याच्या सत्तांतरात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सत्ताधारी व विरोधक यांच्यात मतैक्य घडवून आणणारा हा दुवा आज निखळला आहे.

रामचंद्र भगत हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते. आज सकाळी 79 व्या वर्षी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी होते. विशेषतः कारखाना कार्यक्षेत्रातील एक अजातशत्रू व्यक्ती गमावल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

भगत हे गावातील सिद्धेश्वर सोसायटीतील कारभार सुधारायचा या हेतूने 1965 च्या दरम्यान ऐन विशी-पंचविशीत सहकारात उतरले. सोसायटी ताब्यात घेऊन सुधारणा केली. यानंतर  सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक कै. मुगुटराव काकडे व कारखान्याचे अध्यक्ष कै. बाबलाल काकड़े या त्यावेळच्या राजकारण व सहकारातील अत्यंत मातब्बर धुरीणांच्या मैत्रीत आले. 1975 ला बाबलाल काकडे यांनी त्यांना संचालक मंडळात प्रवेश दिला. तेंव्हापासून काकडे गटाकडून 92 पर्यंत ते संचालक राहिले. या काळात दहा वर्षे ते कारखान्याचे उपाध्यक्ष होते. 1991-92 मध्ये कारखाना विस्तारीकरणात अडचणीत आला होता. यादरम्यान वैचारिक मतभेद झाल्याने भगत यांनी काकडे गटाची साथ सोडली. मात्र काकडे गटांशी त्यानंतरही त्यांचे सलोख्याचे संबंध कायम राहिले.

सोमेश्वर ताब्यात घ्यायचे स्वप्न पाहणारे तरुण अजित पवार यांनी भगत यांची स्वतः वाड्यावर जाऊन भेट घेतली आणि राजकारण फिरले. अजित पवार यांनी रामचंद्र भगत व शहाजी काकडे हे काकडे गटाचे बिनीचे शिलेदार आपलेसे करत कारखान्याची सत्ता तीस वर्षांनी ताब्यात घेतली. या ऐतिहासिक सत्तातरानंतर शरद पवार व अजित पवार यांचे विश्वासू सहकारी बनले. 1992 पासून 2007 पर्यंत सलग पंधरा वर्षे ते संचालक राहिले. 32 वर्ष सेवेनंतरही पवारांनी त्यांचे घर कारखान्याच्या सत्तेत ठेवले. 2007 पासून आजतागायत सुनील भगत हे त्यांचे पुतणे संचालक आहेत. ते तीन वर्षे उपाध्यक्षही होते. त्यामुळे भगत घराणे आणि कारखाना हे अतूट नाते आहे.

रामचंद्र भगत यांचा कारखाना कार्यक्षेत्रात प्रभाव असल्याने व काकडे व पवार या दोन्ही गटांशी सलोखा असल्याने कारखान्याशी संबंधित वादात, आंदोलनात ते नेहमीच दुवा बनले. वार्षिक सभेत अत्यंत वादाचे प्रसंग उदभवले तर अंतिम शब्द भगतबापू यांचा असायचा. कारखान्याची पदाधिकारी निवड, महत्वाची धोरणे यातही पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्या शब्दाला वजन होते. त्यामुळे राजकारणातल्या नव्या पिढ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त दबदबा होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com