कार्यकर्त्यांचे `लाला`, माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

अनेक राजकीय कार्यकर्ते त्यांनी घडविले...
sambhajirao kakade
sambhajirao kakade

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकारतज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे ऊर्फ लाला यांचे वृद्धपकाळाने आज पुण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यातही सहकार क्षेत्रात काकडे कुटुंबाचा दबदबा होता. या कुटुंबातून राज्य पातळीवर चमक दाखविणाऱ्या नेत्यांत संभाजीरावांचा समावेश होता. लाला या नावानेच कार्यकर्त्यांत ते परिचित होते. (Sambhajirao Kakade no more) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून त्यांची राज्यात ओळख होती. 

बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Parlimentary Constituency) ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले होते. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. लोकनेते शंकरराव मोहिते पाटील, बाळासाहेब देसाई , चिमणराव कदम , प्रेमलाकाकी चव्हाण, डी. वाय. पाटील आदी घराण्यांशी त्यांचे नातेसंबंध होते. ते पहिल्यांदा पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून 1971 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1977 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. शरद पवार यांनी लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा 1987 मध्ये बारामतीचे खासदार झाले. ते 1990 मध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्या वेळी त्यांच्या प्रचाराला तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग हे आले होते. तेव्हा सिंग यांची सभा गाजली होती.

संघटना काॅंग्रेस, जनता पक्ष आणि जनता दल या तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. अनंतराव थोपटे, सुभाष कुल, किसनराव बाणखेले, व्यंकप्पा पत्की, बबनराव पाचपुते, बबनराव ढाकणे आदी नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संंबंध होता. किसनराव बाणखेले यांनी तर त्यांच्या नावाने लाला अर्बन बॅंक स्थापन केली होती.  अनेक कार्यकर्त्यांची कारकिर्द त्यांनी घडविली. 

शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून ``संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले. शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली,`` असे त्यांनी म्हटले आहे. 

मोठ्या दिलदार मनाचा माणूस माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! मला राजकीय जीवनात घडवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यापैकी माजी खासदार संभाजीराव काकडे सर्वात अग्रणी होते, अशी भावना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केली. 

ही बातमी वाचा : म्हणून नितीन गडकरींनी पंतप्रधान व्हाव, असं अनेकांना वाटत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com