आमदाराच्या या आकड्यांनी पोलिस चक्रावले : एकूण बॅंक खाती 170 आणि सर्व गाड्यांचा नंबर 7171 - Pune police shocked after MLA having 170 bank accounts number of all vehicles 7171 | Politics Marathi News - Sarkarnama

आमदाराच्या या आकड्यांनी पोलिस चक्रावले : एकूण बॅंक खाती 170 आणि सर्व गाड्यांचा नंबर 7171

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

बॅंकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी बॅंकेचा भोसले यांच्यासह 16 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

पुणे ः शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष आमदार अनिल भोसले यांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरवात केली आहे. भोसले यांच्या लॅंड क्रूझर, टोयाटो कॅमरे अशा दोन गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच भोसले यांच्या 32 कोटी रुपयांच्या मालमत्ता अधिगृहीत करण्याचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. 

बॅंकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी भोसले यांच्यासह 16 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी आमदार भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव यांना पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी आवश्‍यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. 

दरम्यान, 22 व 23 सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. जी. करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आमदार भोसले यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडील दोन गाड्या जप्त केल्या. त्यामध्ये एक कोटी रुपये किमतीची लॅंड क्रूझर, तर 20 लाख रुपये किमतीची टोयाटो कॅमरे या गाड्यांचा समावेश आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी तानाजी पडवळ याची तीन लाख रुपये किमतीची मारुती बलेनो ही गाडी देखील जप्त करण्यात आली. 

भोसलेंकडे 18 हून अधिक मालमत्ता, 170 बॅंक खाती आणि बरच काही ! 
भोसले यांच्याकडे कोरेगाव मूळ येथे स्वतःची शेती आहे. तसेच शिवाजीनगर, विश्रांतवाडी, कोथरूड, वारजे यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात दुकाने, व्यावसायिक संकुल, दुकाने, सदनिका, मिळकती अशा 18 हून अधिक मालमत्ता आहेत. त्याचबरोबर त्यांची 170 बॅंक खाती असून त्यामध्ये एक कोटी 90 लाख रुपयांची रोकड आहे. संपूर्ण मालमत्तेची किंमत 32 कोटी रुपये इतकी असून ही मालमत्ता अधिगृहीत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. संबंधित प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर संबंधित मालमत्तांचा लिलाव करून त्यातून येणारे पैसे ठेवीदारांना देण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. 

सगळ्याच गाड्यांना 7171 
अनिल भोसले यांच्याकडील अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यापैकी स्वतःच्या नावावर असणाऱ्या लॅंड क्रूझर व कॅमरे पोलिसांनी जप्त केली आहे. तर उर्वरित गाड्या बॅंकेच्या नावावर आहे. लॅंड क्रूझर, कॅमरे या दोन्ही गाड्यांचा क्रमांक 7171 असा आहे. तर उर्वरित गाड्यांनाही 7171 हाच क्रमांक आहे. हाच क्रमांक ठेवण्यामागे नेमके काय गुपित आहे, याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. 

आणखी एक बडा नेता अडकणार पोलिसांच्या जाळ्यात ! 
आमदार भोसलेंवर कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील आणखी एका नेत्याला गळाला लावण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू असून येत्या दोन-चार दिवसांत त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख