राष्ट्रवादीच्या नेत्याची दोन कोटींची गाडी जप्त : गुंड मारणेला वाहन पुरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल - police detains land cruiser which was provide to gangster Gaja Marane | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या नेत्याची दोन कोटींची गाडी जप्त : गुंड मारणेला वाहन पुरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

या नेत्यांनी गाड्या दिल्या नसत्या तर पुढचे गुंडाच्या मिरवणुकीचे रामायण घडले नसते, असा पोलिसांचा दावा

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा तुरुंग ते पुणे या मिरवणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. या मिरवणुकीवरून गजावर पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच या मिरवणुकीसाठी त्याने जी गाडी वापरली होती ती जप्त केली आहे. आता ही गाडी किमान पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणून दाखवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी राष्ट्रवादीच्या एका नेत्याची आहे. मारणेला इतर गाड्या पुरविणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लॅंड क्रुझर ही अलिशान गाडी गजाला देण्यात आली होती. त्यासोबत इतर 300 गाड्या मिरवणुकीत होत्या, अशी माहिती  पोलिसांनी न्यायालयात दिली होती. गजा मारणे ज्या गाडीत बसून आला ती लॅंड क्रुझर वडगाव शेरीतील राष्ट्रवादीचे नेते नारायण गलांडे यांच्या कुटुंबाच्या मालकीची होती. ती गाडी सध्या वादग्रस्त ठरली आहे. या गाडीची बाजारभावाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. पुण्यातही या गाड्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ही अलिशान गाडी गुंडाला देताना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याने गंडा घातल्याचा गलांडेंचा दावा आहे. विशेष म्हणजे ज्याने गलांडे उल्लू बनविले त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला असून तो सध्या `नाॅट रिचेबल` आहे. 

MH 12 JN 1000 या क्रमांकाची लॅंड क्रूझर नारायण यांचे चुलते रमेश गलांडे यांच्या नावावर आहे. मात्र तिचा वापर नारायण हेच करत होते. मिरवणुकीचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी त्यांना याबाबत बोलावून घेतले आणि गाडी जप्त केली. गजा मारणेवर तळेगाव दाभाडे, नवी मुंबई येथेही गुन्हे दाखल झाल्याने या पोलिसांच्याही ताब्यात ही गाडी द्यावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एवढी महागडी गाडी गुंडाला देणे गलांडे यांना चांगलेच भोवले आहे.  या गुंडाची मिरवणूक काढली गेल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्याच पक्षाच्या नेत्याची गाडी मारणेसाठी वापरले गेल्याचे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचीही या प्रकरणी अडचण निर्माण झाली.

ही पण बातमी वाचा - गुंड गजा मारणेसाठी लॅंड क्रुझर

राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी गजा मारणेसाठी हे वृत्त `सरकारनामा`ने  सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. त्याचे राजकीय पडसाद उमटले. मात्र त्यापुढचा किस्सा वेगळाच घडला. नारायण गलांडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल दळवी हे त्यांची गाडी गजा मारणेकडे घेऊन गेल्याचा दावा केला आहे. दळवी याने एक नाही तर दोन गाड्या मारणेच्या मिरवणुकीसाठी पुरवल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती कोथरूडचे पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी `सरकारनामा`ला दिली. ``या गाड्या पुरवल्या नसत्या तर हे मिरवणुकीचे प्रकरण घडलेच नसते. आपण कोणाला गाडी देत आहोत, कशासाठी देत आहोत, याची कल्पना संबंधितांना होती की नाही, याची खात्री करून हा गुन्हा दाखल केला आहे. मूळ गाडीमालक नारायण गलांडे यांनी आपल्याला दळवीच्या कृत्याची कल्पना नसल्याचा दावा केला आहे. मात्र त्याची खातरजमा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इतर पोलिस ठाण्यांनी या गाडीची मागणी केल्यास त्यांना ती दिली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली. 

नारायण गलांडे यांनी वडगाव शेरी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक 2014 मध्ये मनसेकडून लढविली होती. त्यानंतर 2017 मध्ये राष्ट्रवादीकडून त्याने महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्या आधी काॅंग्रेसकडूनही हा नेता 2012 मध्ये महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात उतरले होते.

ही पण बातमी वाचा : याची पुसटशी कल्पना मारणेला नव्हती

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून गजाची निर्दोष मुक्तता झाल्याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या गजाचे तुरुंगाबाहेर पडताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. पुण्याकडे येताना तीनशे मोटारीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील ऊर्से टोलनाक्यावर हा ताफा आला. तेथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ड्रोनने या आनंदोत्सवाचे चित्रीकरणही तेथे करण्यात येत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख