कोविड हे निमित्त : `या कारणामुळे` MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय....

सरकारची दोन्ही बाजूंनी कोंडी
mpsc students agitation in Pune
mpsc students agitation in Pune

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाची येत्या 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थींत असंतोष व्यक्त होत आहे. कोविड साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यासाठी सूचना राज्य सरकारने दिल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. खरे कारण मात्र दुसरेच असण्याची शक्यता आहे.

यातील प्रमुख कारण आहे ते मराठा आरक्षणाच्या भिजत घोंगड्याचे. मराठा आरक्षणावर निर्णय होत नसल्याने सरकारी नोकरभरतीचे त्यातही एमपीएससीमार्फत होणाऱ्या भरतीचे काय करायचे, यात राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी दोन्ही छत्रपती म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले हे आक्रमक झाले आहेत. विनायक मेटेंसारखे आमदारही याबाबत आग्रही आहेत. मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत भरती नको, अशी या नेत्यांची मागणी आहे. 

उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला विष खायची वेळ आली आहे, अशी भाषा वापरत आक्रमकपणा काल धारण केला. तसेच मराठा समाजाचा आक्रोश सर्व आमदारांच्या कानांवर पोहोचत नसल्याने त्यांना मूकबधीर शाळांत पाठवा, अशी उपरोधिक मागणी केली. त्यामुळे सरकारसमोही पेच निर्माण झाला. मराठा नेत्यांचा दबाव, विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी होणारी तगमग यातून काय निर्णय घ्यावा, या संभ्रमात सरकार होते. यातून मार्ग काढण्यासाठी कोरोनाच्या स्थितीचा सरकारने उपयोग केला आणि कोरोनाच्या स्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना आयोगाला केली. आयोगाने त्यानुसार निवेदन जाहीर केले. ते जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू केले. 

विनायक मेटे यांनी या परीक्षा पुढे गेल्याचे स्वागत केले आहे. ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या (एसइबीसी) जागा बाजूला ठेवून इतर जागांसाठी परीक्षा घ्यावी, अशी सूचना केली आहे. राज्यातील विविध पक्षांतील तरुण नेतेही आता ही परीक्षा घ्या म्हणून मागणी करत आहेत. त्यातील काही मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत परीक्षा पुढे ढकला, अशीही मागणी करत होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात तातडीने उतरून परीक्षा घेण्याची मागणी केली. इतर नेत्यांनीही मग हिच मागणी लावून धरली. सरकार यातून काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com