मेधा कुलकर्णी या रामदास आठवलेंनाही भेटल्या.. मग त्या रिपब्लिकन पक्षात जाणार आहेत काय? - medha kulkarni met Ramdas Athawale that means she would join RPI asks Chandrakantdada | Politics Marathi News - Sarkarnama

मेधा कुलकर्णी या रामदास आठवलेंनाही भेटल्या.. मग त्या रिपब्लिकन पक्षात जाणार आहेत काय?

उमेश घोंगडे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची सरकारमानाला एक्सक्लुजिव्ह मुलाखत. सरकारनामाच्या सर्व सोशल मिडिया अकौंटवर शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. 

पुणे : विविध कामानिमित्त भाजपची नेतेमंडळी ही सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात. याचा अर्थ ते त्या पक्षात जाणार असे होत नाही. मेधा कुलकर्णी या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नुकत्याच भेटल्या, याचा अर्थ त्या रिपब्लिकन पक्षात जाणार असे होत नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार मेधा कुलकर्णी या भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

मेधा कुलकर्णी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या आधी देखील कुलकर्णी या अजितदादांना भेटल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकिट नाकारल्यापासून कुलकर्णी या नाराज आहेत. त्यातून त्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा या भेटीनंतर सुरू झाली. याबाबत `सरकारनामा`शी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की विकासकमांत राजकारण नको, अशी आमची भूमिका आहे. विकासकामांसाठी सर्वच पक्षांचे नेते एकमेकांना भेटतात. ब्राह्मण महासंघाच्या कामाच्या निमित्ताने मेधा कुलकर्णी यांनी अजितदादांची भेट घेतली. त्या आधी त्या रामदास आठवले यांनाही भेटल्या होत्या. याचा अर्थ त्या संबंधित नेत्यांच्या पक्षात जाणार असे होत नाही. त्या मलादेखील उद्या भेटणार आहेत. त्यामुळे नाराजीमुळे त्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असे चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची काही मते आहेत. ते नाराज आहेत. पण ते आमचे मार्गदर्शक आहेत. पक्षाकडून त्यांना संधी पाहिजे आहे. त्यासाठी ते आग्रही आहेत. त्यांच्याशी मी बोलतो आहे. त्यांच्या वाढदिवशी देखील त्यांच्याशी माझे बोलणे झाले होेते. पक्षाबद्दलची मते जाहीरपणे मांडू नका, असा सल्ला मी त्यांना दिला आहे. सारखे टिव्हीवर जाऊ नका, या शब्दांत त्यांना सांगितले असल्याचे पाटील यांनी नमूद केले. 

विधानसभा निवडणुकीत तिकिट नाकारले गेलेले विनोद तावडे यांनाही संधी मिळणार असल्याची घोषणा पाटील यांना या वेळ केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्ष संघटनेत संधी दिली आहे.  पंकजा मुंडे यांना पक्षात केंद्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा चंद्रकांतदादांनी केली होती. ती अद्याप पूर्ण झाली नसल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणाले की पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी अद्याप ठरायची आहे. कोरोनामुळे तसेच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजारपणामुळे काही बाबी राहिल्या आहेत. त्या योग्य वेळी मार्गी लागतील आणि त्यात पंकजा यांना नक्की संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.  

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहारच्या निवडणुकीच्या जबाबदारीवर आहेत. याचा अर्थ ते यापुढे केंद्रात जातील का, या प्रश्नावर चंद्रकांतदादा म्हणाले की भाजपची ती पद्धत आहे. एका राज्याचा नेता दुसऱ्या राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी घेतो. महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्याकडे होती. ती निवडणूक झाल्यानंतर यादव हे पुन्हा मूळ जबाबदारीच्या ठिकाणी गेले. बिहारची निवडणूक संपल्यानंतर फडणवीसही पुन्हा मूळ ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात येतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख